दिल्लीचे ज्येष्ठ साहित्यिक एम. जे. भगत यांच्यावर सोलापुरात उपचार सुरू, पंढरपूरमध्ये आढळले होते दयनीय अवस्थेत
पंढरपूर : जेष्ठ साहित्यिक एम. जे. भगत पंढरपूरमध्ये भीक मागताना निराधार आणि दयनीय अवस्थेत आढळून आले. आता त्यांच्यावर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
पंढरपूर : दिल्ली येथील ज्येष्ठ साहित्यिक एम जी भगत हे दोन दिवसापूर्वी रात्री पंढरपूरमध्ये अतिशय दयनीय अवस्थेत आढळून आले. त्यानंतर रॉबिन हूड आर्मीच्या तरुणांनी त्यांना उपचारासाठी सोलापुरात दाखल केले. भगत यांची ओळख पटताच आता सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले असून त्यांच्या कुटुंबाशीही संपर्क झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
दोन दिवसांपूर्वी रेल्वे स्टेशनजवळ असणाऱ्या सैनिक वस्तीगृहाच्याकडेला रस्त्यावर मधुकर गोपाळ भगत हे भीक मागताना आढळून आले होते. यावेळी शेजारून जाणाऱ्या रॉबिन हूड आर्मीचे सुरज दिवाण यांनी त्यांची चौकशी सुरु केल्यावर ते इंग्रजीत बोलू लागल्यावर या तरुणाने भगत यांचे नाव गुगलवर तपासले असता भगत यांची ओळख पटली. अंगावरील कपडे फाटलेले , पायाला जखमा , घाणीत मळलेले अंग अशा दुरावस्थेत भगत येथे पडले होते. रॉबिन हुडच्या तरुणांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्यांना पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र भगत यांना खूप शारिरीक वेदना होत असल्याने त्यांना तातडीने सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सोलापुरात उपचार सुरु होताच त्यांच्या नातेवाईकांचा शोध सुरु केल्यावर दिल्लीत संपर्क झाला.
मिळालेल्या माहितीनुसार भगत हे मानसिक दृष्ट्या अस्थिर असून ते गेल्या महिन्यापासून दिल्ली येथील त्यांच्या निवासातून बेपत्ता झाले होते. आता सोलापुरात त्यांच्यावर उपचार सुरु झाले असून त्यांच्या पोटात पाणी झाले आहे. याशिवाय त्यांच्या लिव्हरला देखील सूज असून पायाच्या जवळील शस्त्रक्रियेच्या जखमा देखील चिघळल्याचे उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले. काही दिवसापासून भगत हे उपाशी असल्याने त्यांना खूपच अशक्तपणा आल्याचेही डॉक्टर संजीव ठाकूर यांनी सांगितले. सोलापूरला हलवत असताना प्रा. भगत यांच्याशी संवाद झाला तो अचंबीत करणारा होता. प्रा. भगत या दोघांशी अस्सल इंग्रजी मधून बोलत होते त्यांनी साहित्यिक असल्याचे व अनेक पुस्तकांचे लिखाण केल्याचे सांगितले. मला खूप शारीरिक वेदना होत आहेत मला तातडीने रुग्णालयात घेऊन चला माझ्यावर उपचार करा अशी विनंती त्यांनी केली होती. प्रा. भगत यांची चारही मुले उच्च शिक्षित व वरिष्ठ पदावर काम करतात.