Congress: विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसकडून लॉबिंग सुरू, काँग्रेसच्या मागणीमुळे मविआमध्ये पुन्हा वाद?
विधानसभेप्रमाणे विधान परिषदेत देखील संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेते पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्षातील आमदारांचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र देखील लिहिले आहे.
मुंबई : विधानसभेप्रमाणे विधान परिषदेत देखील काँग्रेसकडून (Congress) विरोधी पक्षनेते पदासाठी लॉबिंग सुरू करण्यात आले आहे. संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेते पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्षातील आमदारांचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र देखील लिहिले. काँग्रेसच्या या मागणीनंतर महाविकास आघाडीत बिघाडी? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर सभागृहातल्या संख्याबळाचे आकडे बदलले आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. त्यानंतर विजय वडेट्टीवार यांची विरोधी पक्षनेता म्हणून निवड करण्यात आली. विधानसभेप्रमाणे विधान परिषदेत देखील संख्याबळाच्या आधारे विरोधी पक्षनेते पद पदरात पाडून घेण्यासाठी पक्षातील आमदारांचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र देखील लिहिले आहे.
सतेज पाटील, राजेश राठोड आणि अभिजीत वंजारी यांची नावे चर्चेत
पत्रावर विधानपरिषदेच्या 9 पैकी 6 आमदारांच्या सह्या आहेत. अभिजित वंजारी, प्रज्ञा सातव, वजाहाद मिर्झा, राजेश राठोड, धीरज लींगडे, सुधाकर अडबाले यांनी सह्या केल्या आहेत. काँग्रेसमध्ये सतेज पाटील, राजेश राठोड आणि अभिजीत वंजारी यांची नावे चर्चेत आहे. राज्यातील जातीय समीकरण पाहता विधानसभेत ओबीसी नेते विजय वडे्टीवार यांना संधी देण्यात आल्याने विमुक्त जाती भटक्या जमातीला विधान परिषदेत संधी देण्याची मागणी करण्यात आले आहे.
विधानपरिषदेत सध्या असलेली पक्षनिहाय स्थिती
विधानपरिषदेत सध्या काँग्रेस पक्षाचे नऊ, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट चार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गट पाच, शिवसेना उद्धव ठाकरे गट आठ, शिवसेना शिंदे गटाचे तीन जण आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचं संख्याबळ सर्वाधिक आहे. त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. सध्या काँग्रेस पक्ष हाच सर्वाधिक संख्या असलेला विरोधी पक्ष आहे.
ठाकरे गट काय भुमिका घेणार?
विरोधी पक्षनेता हा विरोधी बाकावरच्या सर्व पक्षांचं प्रतिनिधित्व करत असतो. एकूण संख्याबळाच्या एकदशांश तरी संख्या पूर्ण करणारे पक्ष या पदावर दावा करु शकतात अशी अट आहे. त्यात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला हे पद मिळतं. सध्या विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते पद अंबादास दानवे यांच्याकडे आहे. काँग्रेस नेत्यांच्या या मागणी नंतर ठाकरे गट काय भुमिका घेणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
हे ही वाचा :
Rahul Gandhi : दोन वर्षाची शिक्षा, खासदारकी गेली... आता निर्णयाला स्थगिती; राहुल गांधींच्या खटल्याची क्रोनोलॉजी जाणून घ्या