Beed Crime Satish Bhosale: लोक बायांवर पैसे उधळतात, मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? खोक्या भाईचं 'बाणेदार' उत्तर
Beed Crime: पुराव्यासह लवकरच पोलिसांना खोक्या शरण येणार सूत्रांची माहिती. सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची आलिशान कार पोलिसांनी शिरूर परिसरातून जप्त केली आहे.

बीड: आपण एखाद्या लग्नात पैसे ओवाळून टाकतो, त्याला माज म्हणायचं का? मी पैसे उधळले म्हणजे काय केलं, तर माझ्या मित्राच्या लग्नात हजार रुपये सोडून दिले, त्याला कसला माज म्हणायचं?, असा प्रतिसवाल सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने विचारला आहे. भाजप आमदार सुरेश धस यांचा निकटवर्तीय असलेल्या सतीश भोसले (Satish Bhosale) याने एका व्यक्तीला रक्तबंबाळ होईपर्यंत बॅटने मारहाण केल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर सतीश भोसले उर्फ खोक्या भाईचा (Khokya Bhai) बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीचा सातबारा समोर आला होता. पोलिसांनी खोक्या भाईवर गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र, पोलिसांच्या हाती न लागलेल्या खोक्या भाईने एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली.
या मुलाखतीत सतीश भोसले उर्फ खोक्या भाईने आपली बाजू मांडली आहे. आपण एखाद्या लग्नात पैसे ओवाळून टाकतो, त्याला माज म्हणायचं का आपण? मित्राच्या कार्यक्रमात मी पैसे उधळले तो आनंदाचा क्षण होता. माझे पैसे मी उधळणारच ना. मी तो कष्टाने कमावलेला पैसा होता. मित्रासाठी हजार रुपये उधळणे चुकीचे असेल तर काढा इन्स्टाग्राम, त्यावर लोक तुम्हाला करोडो रुपये उधळताना दिसतील, असे सतीश भोसले याने मुलाखतीत म्हटले आहे.
कोणी बायांवर पैसे उधळतं, हे पाहा ना तुम्ही. मी मित्रासाठी उधळले तर काय झालं? मी छोट्या कुटुंबातील माणूस आहे. कारखान्याचे पैसे आले तर माझ्या मनात आलं की, आपलाही एक व्हिडीओ बनवून घ्यावा. माझ्याकडे तेव्हा पैसे आले होते, यामध्ये माज कसला आला? हातात पैसे आहेत तोपर्यंत एक व्हिडीओ बनवून घ्यावा, असे मला वाटले म्हणून मी तो व्हिडीओ तयार करुन घेतला, असे सतीश भोसले याने म्हटले.
माझ्या मित्राच्या बायकोकडे नको ती मागणी केली म्हणून मी त्याला मारलं: सतीश भोसले
सतीश भोसले याने सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या त्याच्या व्हिडीओसंदर्भात भाष्य केले. यामध्ये दोन प्रकरणं आहेत. मी बॅटने मारल्याचं प्रकरण आहे, त्यामधील दिलीप ढाकणे हा माझा मित्र माऊली खेडकरच्या पत्नीची छेड काढत होता. त्याच्याकडे माऊली खेडकरच्या बायकोचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ होता. तो व्हिडीओ व्हायरल करेल, अशी धमकी तो देत होता. तू मी सांगितलेल्या गोष्टी केल्या नाहीत तर मी आंघोळ करतानाचा तुझा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन, अशी धमकी ढाकणे देत होता. मला माऊली खेडकरने मदत मागितली. मी तिकडे गेलो तेव्हा माझं डोकं संतापलं आणि मी ढाकणेला बॅटने मारलं. माऊली खेडकर हा जातीने वंजारी आहे, मी आदिवासी आहे. मग यामध्ये जातीय द्वेषाचा प्रकार कुठे येतो, असा सवाल सतीश भोसले याने व्यक्त केला.
आणखी वाचा























