मराठवाड्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे 99 टक्के पंचनामे, आता प्रतीक्षा नुकसानभरपाईची
Marathwada News : अवकाळीच्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आणखी किती कालवधी लागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Marathwada News : मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) मराठवाड्यातील (Marathwada) शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यामुळे पंचनामे करुन नुकसानभरपाई देण्याची मागणी केली जात होती. मात्र शासकीय कर्मचारी यांच्या संपामुळे पंचनामे करण्यासाठी उशीर झाला होता. परंतु आता मराठवाड्यातील 99 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. अवकाळी पावसामुळे 1 मार्च ते 20 मार्च दरम्यान मराठवाड्यातील 11 लाख 7 हजार 5 शेतकऱ्यांचं 60 हजार 258 हेक्टरवर नुकसान झाले आहे. तर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) वगळता सर्व सात जिल्ह्यातील 100 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत.
आता प्रतीक्षा नुकसानभरपाईची
मराठवाड्यात 1 मार्च ते 20 मार्च दरम्यान 11 लाख 7 हजार 5 शेतकऱ्यांचं 60 हजार 258 हेक्टरवर नुकसान झाले असून, 99 टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. मात्र पंचनामे पूर्ण झाले असले, तरीही नुकसानभरपाई (Compensation) कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीची (Heavy Rain) नुकसानभरपाईसाठी चार महिन्यांपेक्षा अधिक वेळ लागला आहे. त्यामुळे आता अवकाळीच्या नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यासाठी आणखी किती कालवधी लागणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
मराठवाड्यातील पंचनामे आकडेवारी...
जिल्हा | बाधित शेतकरी | नुकसान | पंचनामे टक्केवारी |
छत्रपती संभाजीनगर | 31 हजार 455 | 13 हजार 951 हेक्टर | 95.08 टक्के |
जालना | 4 हजार 215 | 1 हजार 969 हेक्टर | 100 टक्के |
परभणी | 5 हजार 999 | 3 हजार 960 हेक्टर | 100 टक्के |
हिंगोली | 6 हजार 526 | 3 हजार 838 हेक्टर | 100 टक्के |
नांदेड | 36 हजार 543 | 21 हजार 579 हेक्टर | 100 टक्के |
बीड 100 टक्के | 7 हजार 850 | 3 हजार 802 | 100 टक्के |
लातूर | 22 हजार 565 | 10 हजार 367 हेक्टर | 100 टक्के |
धाराशिव | 2 हजार 652 | 1 हजार 349 | 100 टक्के |
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा अंदाज!
आधीच अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला असताना, आता आणखी एकदा मराठवाड्यात पावसाचा अंदाज (Weather Forecast) वर्तवण्यात आला आहे. दरम्यान 6 एप्रिल रोजी परभणी (Parbhani) जिल्ह्यासह मराठवाड्यात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचा अंदाज वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील ग्रामीण कृषी मौसम सेवाचे मुख्य प्रकल्प समन्वयक डॉ. कैलास डाखोरे यांनी वर्तवला आहे. त्यामुळे आता पुन्हा अवकाळी पाऊस (Unseasonal Rain) पडल्यास याचा मोठा फटका फळबागांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची (Farmers) पुन्हा एकदा चिंता वाढली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :