'या' कारणांनी शिवसेना आमदारांनी बंड पुकारले; शिरसाट यांच्या पत्रातील प्रमुख दहा मुद्दे
तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो..
Maharashtra politics: एकनाथ शिंदे यानी पुकारलेल्या बंडानंतर राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. मात्र एवढ्या मोठ्याप्रमाणावर शिवसेनेचे आमदार फुटले कसे असा प्रश्न अनेकांना पडत होता. आणि याच प्रश्नाचे उत्तर आता औरंगाबाद पश्चिमचे शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहे. शिरसाट यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहले असून, त्यातून आमदारांची व्यथा मांडली आहे. शिरसाट यांनी पाठवलेल्या पत्रातील प्रमुख दहा मुद्दे नेमके काय आहेत पाहू यात...
शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रातील प्रमुख दहा मुद्दे
- गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी 'वर्षा'चे दारे बंद होती.
- शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात आम्हाला कधीही थेट प्रवेश मिळाला नाही.
- आमच्यासाठी मंत्रालयातील सहाव्या माळ्याचाही प्रश्न आला नाही कारण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही.
- तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. बडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो..
- आमची व्यथा,आपल्या आजूबाजूच्या बडव्यांनी कधीच आपल्यापर्यंत पाह्चू दिली नाही.
- आमची ही सर्व गाऱ्हाणी पक्षात फक्त शिंदे साहेबच ऐकत होते.
- आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं?
- विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला?
- आमच्या प्रत्येक कठिण प्रसंगांत शिंदे साहेब यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे आहेत, या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत आहोत.
- काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते अत्यंत भावनिक होतं. पण त्यात आमच्या मुळ प्रश्नांची उत्तरं कुठेच मिळाली नाहीत.
कोण आहेत शिरसाट...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहणारे संजय शिरसाट यांचा राजकीय इतिहास खूपच संघर्षाचा आहे. शिरसाट यांच्या खांद्यावर जेव्हा घरची जवाबदारी आली त्यावेळी त्यांनी सुरुवातीला भाजीपाला विकला, गॅसचे फुगे विकले. त्यानंतर 7 रुपये रोजंदारीवर एका कंपनीत काम केलं. पुढे ते ऑटो रिक्षाचालकाचं काम करू लागले. दरम्यान याच काळात ते शिवसेनेशी जोडले गेले.
पुढे 2000 मध्ये महानगर पालिकेत नगरसेवक म्हणून ते निवडून आले. सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत त्यांनी पक्षात आपली छाप पाडली. त्यामध्ये त्यांनी सभागृह नेतेपद भूषवले. 2009 मध्ये नव्याने अस्तित्वात आलेल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात त्यांनी आमदारकी लढवत विजय मिळवला. त्यानंतर सलग तीनवेळा आमदार म्हणून ते निवडून आले.