म्हणून हॉटेलमध्येच कपड्याचे दुकान थाटले,पण एकनाथ शिंदेंच्या..; शिरसाट यांनी सांगितली बंडाची कहाणी
Aurangabad News: औरंगाबादच्या एका आमदाराला पॅन्ट मोठी झाल्याने अडचण झाली होती. पण त्यांच्या पीएने ती कमी करून आणली.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता सर्व बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात परतले आहे. दरम्यान बंडखोरी करून मुंबईतून बाहेरपडल्यापासून तर एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीपर्यंत नेमकं काय घडले याबाबत प्रत्येकजण आपापली आपबीती सांगत आहे. औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांनी सुद्धा आपल्या बंडाची कहाणी सांगितली. रात्री दोन वाजता सुरतमध्ये पोहचल्यावर पहिल्या दिवशी काय झाले हे सुद्धा त्यांनी सांगितले.
माध्यमांशी बोलतांना शिरसाट म्हणाले की, कुठे जायचं होते कुणालाही माहित नव्हते. पण एकनाथ शिंदे यांनी म्हंटल्यावर आम्ही कुणीही काहीही न विचारता त्यांच्यासोबत गेलो. रात्री दोन वाजेच्या सुमारास सुरतच्या हॉटेलमध्ये पोहचलो. त्यात आमच्यातील एकाही आमदारांनी कपडे सोबत आणले नव्हते.
त्यामुळे आम्ही एकनाथ शिंदे यांना याबाबत सांगितले आणि 21 जून रोजी सकाळीच आमच्या हॉटेलमध्ये कपडे घेऊन एक गाडी आली. हे पाहून जणू कपड्यांचे दुकानच हॉटेलमध्ये असल्याचं वाटत होते. त्यातून सर्वांनी आपापल्या पसंतीचे कपडे घेतले. याबरोबरच दाढीचे साहित्य, चपला आदी साहित्यही तेथेच उबलब्ध झाले. पण त्यातल्या त्यात एकनाथ शिंदेंना मात्र त्यांच्या पॅटर्नचे कपडे मिळाले नाहीत. त्यामुळे त्यांचे कपडे संध्याकाळी ठाण्यातील घरून सुरतला आल्याचे शिरसाट म्हणाले.
एका आमदाराची पॅन्ट मोठी झाली आणि...
मुंबईतून परत आलेल्यापैकी एका आमदाराने तेथील किस्सा सांगताना सांगितले की, आमच्यासाठी हॉटेलमध्ये कपडे मागवण्यात आले. त्यानुसार सर्वांनी खरेदी केली. मात्र त्यांनतर औरंगाबादच्या एका आमदाराला पॅन्ट मोठी झाल्याने अडचण झाली. त्यामुळे या आमदाराने आपल्या पीएला पॅन्ट कमी करून आणण्याचे सांगितले. पीएने ती पॅन्ट कमी करून आणली आणि त्यांनतर या आमदार महोदयांनी पॅन्ट घातली आणि रूम बाहेर आले.
शिरसाट यांचे जंगी स्वागत...
एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरी करणाऱ्या आमदारांमध्ये संजय शिरसाट आघाडीवर होते. बंडखोरीनंतर उद्धव ठाकरे यांच्यासमोर थेटपणे नाराजी व्यक्त करणारे शिरसाट पहिले आमदार होते. तर त्यांनी ठाकरे यांना पत्र लिहून बंडखोरीचे कारणही सांगितले होते. या सर्व घडामोडींनंतर शिरसाट बुधवारी पहिल्यांदाच शहरात आले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांनी त्यांचे जंगी स्वागत केले. विमानतळापासून तर शिरसाट यांच्या कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली. तर ढोल-ताश्यासह आतिषबाजीही करण्यात आली.