दु:खद! कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा तलावात बुडून मृत्यू; बालदिनी दुर्दैवी घटना
Aurangabad News : दोनी बहिणी कपडे धुण्यासाठी पाझर तलावावर गेल्या होत्या.
Aurangabad Crime News: औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील नागद सायगव्हाण परीसरात एक दुर्दैवी घटना समोर आली असून, पाझर तलावात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सोमवारी बालदिनाच्या दिवशी ही दुर्देवी घटना घडली. काजल परशुराम पवार (वय 15 वर्षे), मीनाक्षी परशुराम पवार (वय 13 वर्षे, रा. होळणांथा ता. शिरपूर जि. धुळे) असे या मुलींचे नाव आहे. तर भिलदरी येथील गोरक पवार यांच्या वीटभट्टीवर आपल्या पालकांसह या मुली मजुरी करण्यासाठी आल्या होत्या.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटाची खळगी भरण्यासाठी जिल्हा बदलून परशुराम पवार हे आपल्या कुटुंबासह नागद सायगव्हाण परीसरात वीट भट्टीच्या कामासाठी आले होते. यावेळी सोबतच त्यांच्या दोन मुलीही होत्या. दरम्यान सोमवारी या दोघी बहिणी सकाळी साडे आकरा वाजेच्या सुमारास भिलदरी हद्दीतील छोट्या पाझर तलावावर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. मात्र यावेळी त्यांचा पाण्यात पाय घसरला आणि त्या पाण्यात बुडाल्या. यावेळी तिथे त्यांना वाचवण्यासाठी कोणीच नसल्याने अकेह्र त्यांच्या बुडून दुर्दैवी मृत्यू झाला.
याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच परिसरातील नागरिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याच्या बाहेर काढले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. या घटनेने पवार कुटुंबावर दुःखाचे मोठं डोंगर कोसळले आहे. तर परिसरात देखील या दुर्दैवी घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.