(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: अवघ्या पाचशे रुपयांच्या वादावरून दोघांची हत्या, आरोपी पोलीसपुत्र
Aurangabad : औरंगाबादच्या घाटी परिसरात सोमवारी दोघांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली होती.
Aurangabad News: औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या परिसरात सोमवारी रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या दोघांची हत्या केल्याची घटना समोर आली होती. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवत खून करणाऱ्या आरोपीला अखेर बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे अवघ्या पाचशे रुपयांच्या वादावरून झालेल्या वादातून आरोपीने खून केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. नागेश्वर शिवलिंगअप्पा घुसे (50, रा. कोहिनूर कॉलनी, मोगलपुरा ) आणि संग्राम रंकट (70) अशी मृतांची नावे आहेत. तर शेख वजीर शेख बशीर (वय 32 वर्षे, रा. कोहिनूर कॉलनी) असे आरोपीचे नाव आहे.
औरंगाबादच्या घाटी परिसरात सोमवारी दोघांची अज्ञात व्यक्तीने हत्या केल्याची घटना समोर आली होती. एकाच्या डोक्यात दगड घालून तर दुसऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. हत्या करण्यात आलेले दोघेही रस्त्याच्या कडेला एका झोपडीत बसलेले होते. एकाच वेळी दोन हत्या झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली होती. त्यामुळे आरोपीचा शोध घेण्याचे पोलिसांसमोर मोठं आव्हान होते. मात्र पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत काही तासाच्या आत आरोपी शेख वजीर शेख बशीर याला बेड्या ठोकल्या.
पाचशे रुपयांसाठी दोन खून....
संग्राम रंकट हे घाटी परिसरातील रस्त्याच्या कड्याला फूटपाथवर एका झोपडीत राहत होते. दरम्यान, नागेश्वर घुसे हे नियमित संग्राम रंकट यांच्याकडे यायचे. त्यामुळे त्यांची ओळख होती. आरोपी वजीरही अधूनमधून तेथे यायचा. रविवारी रात्री ते तिघे तेथे होते. दरम्यान त्यांच्यात पाचशे रुपयांवरून वाद झाला. वाद एवढ्या विकोपाला गेला की, वजीरने दगड उचलून नागेश्वर यांच्या डोक्यात घातला. ज्यात नागेश्वर यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर वजीरने संग्राम यांचा गळा आवळला आणि त्यांची देखील हत्या केली. दोघांना संपविल्यानंतर तो तेथून निघून गेला.
आरोपी पोलीस पुत्र तर मृत्य झालेला पोलीस भाऊ...
मृत नागेश्वर घुसे यांचा भाऊ गणेश घुसे (वय 54, रा. श्रीकृष्णनगर, पिसादेवी रोड) हे जिन्सी ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक आहेत. तसेच, त्यांचा पुतण्याही ग्रामीण पोलिस दलात कर्मचारी आहे. तर हत्या करणारा आरोपी वजीर देखील पोलीस पुत्र असल्याचे समोर आले आहे. तर या हत्येचा घटनेला नशेखोरीचीही किनार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे औरंगाबाद शहरात नशेखोरीचे प्रमाण किती वाढले आहे याचा अंदाज येऊ शकतो. विशेष म्हणजे यातून आता पोलिसांचे कुटुंब देखील सुटले नसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे.
औरंगाबाद हादरलं! रस्त्यावरील दोन 'भिकाऱ्यां'ची निर्घृण हत्या; शहरातील घाटी परिसरातील घटना