(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad : संशयास्पद काहीतरी पुरल्याचा पोलिसांना फोन! पण 'खोदा खड्डा निकला कुत्ता'
Aurangabad: पोलिसांच्या डायल 112 वर एक कॉल आला आणि शहरातील पन्नालालनगर भागात महापालिकेच्या पडीक जागेत काहीतरी संशयास्पद पुरल्याची माहिती मिळाली.
Aurangabad News: औरंगाबाद शहरातील पन्नालालनगरातील महापालिकेच्या जागेत काहीतरी संशयास्पद पुरल्याचा कॉल डायल 112 वर आला आणि पोलिसांची धावपळ उडाली. आलेल्या फोनची उस्मानपुरा पोलिसांनी तत्काळ दखल घेत घटनास्थळी धाव घेतली. पण खोदकाम करायचे असल्याने महसूल विभागाला कळवावे लागते. त्यामुळे नायब तहसीलदारांना पत्र देत घटनास्थळी पाचारण केले. अखेर त्यांच्या परवानगीने खोदकाम सुरू झाले. पण खड्ड्यात मृत कुत्रे पुरल्याचे स्पष्ट झाल्यावर सर्वांचा जीव भांड्यात पडला. ही घटना औरंगाबाद पन्नालालनगरमध्ये शुक्रवारी समोर आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पोलिसांच्या डायल 112 वर एक कॉल आला आणि शहरातील पन्नालालनगर भागात महापालिकेच्या पडीक जागेत काहीतरी संशयास्पद पुरल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी प्रत्यक्षात तेथे दोन बाय तीन फूट आकाराचे खड्डे खोदून, त्यात काहीतरी पुरल्याचे आढळून आले. तसेच, त्या खड्ड्यावर फूल वाहिलेले दिसून आल्याने पोलिसांचा संशय आणखीनच वाढला. त्यामुळे हे खड्डे खोदून पाहण्याचे ठरले.
खड्ड्यात कुत्रे पुरल्याचे समोर आले...
पोलिसांनी खड्डे खोदून पाहण्याचं ठरवल, मात्र खोदकाम करायचे असल्याने महसूल विभागाची परवानगी लागते. त्यामुळे पोलिसांनी खड्डे खोदण्यासाठी तहसीलदारांना पत्र दिले. मात्र, गुरुवारी तहसील कार्यालयातून कोणीही आले नसल्याने खड्डे खोदण्याचे रद्द झाले. मात्र शुक्रवारी दुपारी नायब तहसीलदार योगिता खटावकर या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यामुळे पोलिस निरीक्षक गीता बागवडे यांनी त्यांच्या परवानगीने खड्डे खोदले. जवळपास पाच फूट खड्डे खोदल्यावर त्यात मृत कुत्रे पुरल्याचे समोर आले. त्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. याबाबत पोलिसांनी नोंद घेतली.
खड्ड्यात अर्भक असण्याचा संशय...
खोदकाम करून बुजवलेल्या खड्ड्यावर फूल वाहिलेले दिसून आल्याने कोणाला तरी पुरण्यात आल्याचं स्पष्ट झाले होते. तर खड्डयाचा आकार पाहता कोणीतरी अर्भक पुरल्याचा संशय पोलिसांना होता. त्यामुळे खड्डा खोदेपर्यंत दोन तास धाकधुक कायम होती. परंतु खड्ड्यात मृत कुत्रे निघाल्यानंतर पोलिसांचा संशय दूर झाला आणि सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
पोलिसांची धाकधूक वाढली होती...
शहरातील पन्नालालनगरातील महापालिकेच्या जागेत काहीतरी संशयास्पद पुरल्याचा कॉल आल्याने पोलिसांची धाकधूक वाढली होती. कारण दिवाळीच्या काळात शहरात वेगवेगळ्या ठिकाणी खुनाच्या तीन घटना उघडकीस आल्या होत्या. त्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली होती. तर आता पुन्हा असाच काही प्रकार नाही ना असाही संशय व्यक्त केला जात होता. मात्र खड्डा खोदल्यानंतर मृत कुत्रे आढळून आल्याने पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.