Aurangabad: चालकाने अश्लील प्रश्न विचारल्याने मुलीची धावत्या रिक्षातून उडी, महिला आयोगाने घेतली दखल
Aurangabad: पोलिसांना कार्यवाहीचा अहवाल महिला आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिले आहे.
Aurangabad News: रिक्षात बसलेल्या मुलीला चालकाकडून अश्लील प्रश्न विचारले जात असल्याने घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी घेतल्याची घटना मंगळवारी औरंगाबादमध्ये समोर आली होती. आता या घटनेची महिला आयोगाने (Women Commission) दखल घेतली असून, पोलिसांना कार्यवाहीचा अहवाल महिला आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देश महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिले आहे. याबाबत रुपाली चाकणकर यांनी ट्वीटवरून माहिती दिली आहे.
काय म्हणाल्यात चाकणकर?
याबाबत रुपाली चाकणकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, औरंगाबाद येथे एक अल्पवयीन मुलगी रिक्षामधून प्रवास करत असताना रिक्षाचालकाने तिची धावत्या रिक्षामध्ये छेड काढली. सदर मुलीने घाबरून रिक्षातून उडी मारून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही मुलगी जखमी झाली असून तिच्यावर उपचार चालू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीस अटक केली असून क्रांतीचौक पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. या घटनेची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत पोलिसांना कार्यवाहीचा अहवाल आयोग कार्यालयास सादर करण्याचे निर्देश दिले असल्याचं चाकणकर म्हणाल्यात.
काय आहे प्रकरण...
शहरातील गोपाल टी भागात क्लाससाठी आलेली मुलगी घरी परत जाण्यासाठी एका रिक्षातून प्रवास करत होती. दरम्यान पिडीत विद्यार्थिनी रिक्षात एकटीच बसलेली पाहून चालक अकबर सय्यदने तिच्यासोबत अश्लील बोलायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने सिल्लेखाना येथून उजवीकडे वळालेल्या धावत्या रिक्षातून तिने उडी मारली. यात तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी देखील औरंगाबादमध्ये अशीच घटना समोर आली होती.
रिक्षाचालक होता दारूच्या नशेत....
याबाबत क्रांती चौक पोलिसांनी आरोपी अकबर सय्यदला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु आहे. दरम्यान ज्यावेळी हा सर्व प्रकार घडला त्यावेळी रिक्षाचालक अकबर दारूच्या नशेत होता असे त्याने तपासात सांगितले आहे. तर घरी बायकोसोबत भांडण झाल्याने तणावात दारू पिली होती, त्यामुळे दारूच्या नशेत नको ते मुलीसोबत बोललो अशी कबुली आरोपी रिक्षाचालकाने दिली आहे. अकबर याला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, त्यातून आणखी काही महिती समोर येण्याची शक्यता आहे.
Video: धक्कादायक! रिक्षा चालकाकडून अश्लील प्रश्न, घाबरलेल्या मुलीची धावत्या रिक्षातून उडी