Video: धक्कादायक! रिक्षा चालकाकडून अश्लील प्रश्न, घाबरलेल्या मुलीची धावत्या रिक्षातून उडी
Aurangabad : मुलीच्या डोक्याला गंभीर मार लागला असून, तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Aurangabad Crime News: औरंगाबादमध्ये एका धक्कादायक घटना समोर आली असून, रिक्षात बसलेल्या मुलीला चालकाकडून अश्लील प्रश्न विचारले जात असल्याने घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी घेतली आहे. यात तरुणीच्या डोक्याला गंभीर मार लागला. ही खळबळजनक घटना शहरातील सिल्लेखाना ते शिवाजी हायस्कूल रस्त्यावर संकल्प क्लासेससमोर घडली आहे. तर हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. सय्यद अकबर सय्यद हमीद (वय 39 , रा. प्लॉट क्र. 156, कैसरबाग, कासंबरी दर्गा, पडेगाव) असे अटकेतील रिक्षाचालकाचे नाव आहे.
याबाबत क्रांती चौक पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ. गणपत दराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, खोकडपुरा परिसरातील 17 वर्षीय तरुणी बारावीत शिक्षण घेते. तिने गोपाल टी भागात खासगी शिकवणी लावलेली आहे. ती दररोज रिक्षाने ये-जा करते. दरम्यान 13 नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाबारा वाजता क्लास संपल्यानंतर ती गोपाल टी येथून घराकडे जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत होती. यादरम्यान, आलेल्या एका रिक्षात ती बसली.
घाबरलेल्या मुलीने रिक्षातून उडी घेतली...
पिडीत विद्यार्थिनी रिक्षात एकटीच बसलेली पाहून चालक अकबर सय्यदने तिला सुरवातीला नाव विचारले. पण या तरुणीने कोणतेही प्रतिसाद न देता त्याला उत्तर दिले नाही. तरीही अकबरने काय करते? असा प्रश्न केल्याने तरुणी सावध झाली. मात्र, काहीसे पुढे गेल्यावर अकबरने हद्द ओलांडली. त्याने तिला थेट फिरायला आवडते का? असा प्रश्न विचारला. तो तेवढ्यावरच थांबला नाही. त्याने विद्यार्थिनीशी अश्लील बोलायला सुरुवात केली. त्यामुळे घाबरलेल्या मुलीने सिल्लेखाना येथून उजवीकडे वळालेल्या धावत्या रिक्षातून तिने उडी मारली. यात तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. तिच्यावर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
#Video: धक्कादायक! रिक्षा चालकाकडून अश्लील प्रश्न, घाबरलेल्या मुलीने धावत्या रिक्षातून उडी @KrishnaABP pic.twitter.com/arDaDGGVqV
— ABP माझा (@abpmajhatv) November 16, 2022
पोलिसांनी रात्रीतून 40 सीसीटीव्ही तपासले
घटन घडल्यानंतर दुपारी सव्वादोन वाजता रुग्णालयातून एमएलसी आल्यानंतर क्रांती चौक ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ निरीक्षक डॉ. दराडे यांनी तत्काळ आपल्या विशेष पथकाला रिक्षा शोधण्याचे आदेश दिले. त्यामुळे पथकाने रात्रीतून तब्बल 40 सीसीटीव्ही तपासले. त्यातून रिक्षाचा क्रमांक शोधला आणि चालकाला अटक केली. विशेष म्हणजे आरोपी रिक्षाचालक अकबर सय्यद हा मुंबईचा आहे. तो चार- पाच महिन्यांपूर्वी औरंगाबादेत आला असून, किरायाने रिक्षा घेऊन चालवीत असल्याचे देखील चौकशीत समोर आले आहे.