Aurangabad: पालकमंत्री असतांना सुभाष देसाई 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय काम देत नव्हते; भुमरेंचा आरोप
Aurangabad: फुलंब्री येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना भुमरे यांनी हे आरोप केले आहे.
Sandipan Bhumre On Subhash Desai: शिंदे आणि ठाकरे गटातील वाद आता विकोपाला गेला असून, दोन्ही गटाकडून एकेमकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. दरम्यान रोहयो मंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांनी ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. औरंगाबादचे पालकमंत्री असतांना सुभाष देसाई कार्यकर्त्यांना 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय काम देत नव्हते, असं भुमरे म्हणाले आहे. फुलंब्री येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलतांना भुमरे यांनी हे आरोप केले आहे.
यावेळी बोलतांना भुमरे म्हणाले की, हे काय सांगतात आम्हाला पन्नास खोके यांनी जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या कामांमध्ये 10 टक्के कमिशन घेतले. 10 टक्के कमिशन घेतल्याशिवाय सुभाष देसाई कार्यकर्त्यांना कामे देत नव्हते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी काय करायचं, फक्त झेंडे लावायचे, होर्डिंग लावायचे आणि तुम्ही 10 टक्क्यांनी पैसे घायचे असा आरोप भुमरे यांनी यावेळी केला.
पुढे बोलतांना भुमरे म्हणाले की, कमिशन घेतल्याशिवाय रस्त्याला पैसे देत नव्हते, कंत्राटदारला पैसे देत नव्हते. मी खोटं बोलत असेल तर त्यांनी सांगावे मी खोटं बोलत आहे. अनेक कार्यकर्ते याचे साक्षीदार आहेत. मुबईत बसणारे उद्योग मंत्री आणि मातोश्रीवर वावरणारा माणूस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पैसे मागतो. ग्रामीण भागात आम्ही शिवसेना वाढवली आणि हे आमच्याकडूनच टक्केवारी घेतात. आम्ही गद्दारी केली नसून, उठाव केला. त्यामुळे यांना आता काय म्हणायचे म्हणू द्या असेही भुमरे म्हणाले.
यापूर्वी देखील आमदारांचा आरोप...
औरंगाबादचे पालकमंत्री असतांना सुभाष देसाई विकास कामासाठी कमिशन मागत असल्याचा आरोप यापूर्वी देखील शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांनी केला होता. मात्र औरंगाबादचे पालकमंत्री झाल्यावर भुमरे यांनी उघडपणे देसाई यांच्यावर टक्केवारीचा आरोप पहिल्यांदाच केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील शिंदे आणि ठाकरे गटातील राजकीय वातावरण आणखीनच तापतांना पाहायला मिळत आहे.
शिंदे गटाकडून ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न...
औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर आता जिल्ह्यात देखील सेनेचे दोन गट झाले आहे. मात्र याचवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबाद जिल्ह्यात अब्दुल सत्तार आणि संदिपान भुमरेंच्या रूपाने दोन मंत्रिपद दिले. सोबतच आता भुमरे यांना पालकमंत्री देऊन जिल्ह्यात शिंदे गटाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. जिल्ह्यात शिंदे गटाचे पाच आमदार आहे. त्यामुळे या सर्व आमदारांच्या मतदारसंघात विशेष लक्ष देऊन पक्षाला ताकद देण्याचे काम शिंदे गटाकडून सुरु आहे. तर पालकमंत्री झाल्यावर भुमरे यांनी जिल्हा नियोजन बैठकीत अनेक कामांची घोषणा देखील आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला जात आहे.