Aurangabad Politics: आदित्य ठाकरेंनंतर सुषमा अंधारे, रोहित पवारांची पैठणमध्ये तोफ धडाडणार; भुमरेंच्या मतदारसंघात विरोधकांच्या सभांचा धडाका
sandipan bhumre: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे समजले जाणारे संदिपान भुमरे यांच्या विरोधात विरोधकांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे.
Aurangabad Politics News: शिंदे गटाचे बंडखोर आमदार ठाकरे गटाच्या निशाण्यावर असून, त्यांच्या मतदारसंघात विरोधकांच्या एकामागून एक सभा होतांना पाहायला मिळत आहे. औरंगाबादमधील पैठणचे आमदार तथा रोहयो मंत्री संदिपान भुमरे (sandipan bhumre) यांच्या मतदारसंघात तर विरोधकांनी सभांचा धडाकाच लावला आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे पैठणमध्ये आतापर्यंत दोन दौरे झाले आहेत. तर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या देखील एकामागून एक अशा पैठण मतदारसंघात सभा होणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे समजले जाणारे आणि बंडखोरीच्यावेळी महत्वाची भूमिका बजावणारे संदिपान भुमरे यांच्या विरोधात विरोधकांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता 18 नोव्हेंबरला ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची पैठणमध्ये जाहीर सभा होणार आहे. यासाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आहे. विशेष म्हणजे गेल्या महिन्यातच ही सभा होणार होती, मात्र मुंबईतील एका बैठकीमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली होती. त्यामुळे 18 तारेखला होणाऱ्या सभेतून सुषमा अंधारे या भुमरे यांच्याबद्दल काय बोलणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
रोहित पवारांची देखील सभा...
एकीकडे 18 नोव्हेंबरला पैठणमध्ये सुषमा अंधारे यांची सभा होणार असतानाच, रोहित पवार 22 नोव्हेंबरला पैठण तालुक्यातील शेतकरी मेळाव्याला हजेरी लावणार आहे. पैठणच्या बालानगर येथे रोहित पवार यांच्या उपस्थित राष्ट्रवादीचा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे रोहित पवार देखील शिंदे-फडणवीस सरकारवर यावेळी निशाणा साधण्याची शक्यता आहे. तर याचवेळी भुमरे यांच्याबद्दल रोहित पवार काय बोलणार हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.
आदित्य ठाकरेंची दोन दौरे...
सत्तांतरानंतर संदिपान भुमरे यांच्या पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरे यांचे आत्तापर्यंत दोन दौरे झाले आहेत. 23 जुलैला आदित्य ठाकरे यांनी काढलेली शिव संवाद यात्रा पैठणमध्ये पोहचली होती. यावेळी आदित्य ठाकरे यांनी भुमरे यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधला होता. त्यानंतर आता पुन्हा 8 नोव्हेंबरला याच पैठण मतदारसंघात आदित्य ठाकरे यांनी शेतकरी मेळावा घेत शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. त्यामुळे भुमरे यांचे पैठण मतदारसंघ सद्या विरोधकांच्या निशाण्यावर असल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.