Aurangabad: औरंगाबादच्या राष्ट्रवादीत 'तुझं माझं जमेना', पक्षातील अंतगर्त गटबाजीची पुन्हा चर्चा
Aurangabad : आगामी निवडणुका पाहता नेत्यांची नाराजी दूरू करण्याचे पक्षासाठी आव्हान असणार आहे.
Aurangabad News: राष्ट्रवादीत (NCP) दोन गट असल्याची चर्चा नेहमीच राज्याच्या राजकारणात होत असतांना, आता अशीच काही चर्चा स्थानिक पातळीवर देखील पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता तर गटबाजीवरून थेट आरोप देखील होतांना पाहायला मिळत आहे. वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी आमदार सतीश चव्हाण यांच्यावर थेट आरोप करत पक्षातील गटबाजी सार्वजनिकपणे उघड केली. तेव्हापासून आता पक्षात दोन गट पाहायला मिळत असून, चव्हाण यांच्यापासून दुखावलेल्या गटाकडून चिकटगावकर यांना पडद्यामागून पाठींबा मिळतोय.
2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या काळात सतीश चव्हाण यांच्या पुढाकाराने पैठणमधील तत्कालीन भाजप नेते दत्ता गोर्डे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. फक्त प्रवेश नव्हे तर त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि माजी आमदार संजय वाघचौरे यांचा पत्ता कट झाला. तेव्हा देखील संजय वाघचौरे यांच्या समर्थकांनी सतीश चव्हाण यांच्यावर पक्ष फोडण्याचा आरोप केला. तेव्हापासून अजूनही वाघचौरे समर्थकांच्या मनात चव्हाण यांच्याबद्दल नाराजी आहेच. त्यातच असेच काही चित्र कन्नडमध्ये होण्याचा अंदाज घेत तत्कालीन राष्ट्रवादीचे नेते उदयसिंग राजपूत शिवसेनेत गेले. राजपूत समर्थकांनी देखील चव्हाण यांच्यावर त्यावेळी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे हे सर्व आरोप चिकटगावकर यांनी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीत पुन्हा एकदा दोन गटाची चर्चा पाहायला मिळत आहे.
'तुझं माझं जमेना...'
माजी आमदार चिकटगावकर यांनी थेट चव्हाण यांच्यावर आरोप केल्याने पक्षात सध्या 'तुझं माझं जमेना' परिस्थिती आहे. तर चिकटगावकर ठाकरे गटात जाणार असल्याची देखील चर्चा आहे. पण आपण कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विचारून घेऊ, असे चिकटगावकर यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे सद्या तरी चिकटगावकर राष्ट्रवादीत असून त्यांची आणि समर्थकांची सतीश चव्हाण यांच्याबद्दल नाराजी आहे. त्यातच 2019 मधील संधी गेल्याची खंत वाघचौरे समर्थकांच्या मनात अजूनही कायम आहे. त्यामुळे सद्या तर औरंगाबादच्या राष्ट्रवादी पक्षात नेमकं कोण कोणाच्या सोबत आणि गटात आहे याचा अंदाज बांधणे अवघड नाही. पण आगामी निवडणुका लक्षात पाहता ही नाराजी दूरू करण्याचे पक्षासाठी आव्हान असणार आहे.
चिकटगावकर यांच्या निर्णयाकडे लक्ष...
माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचा विरोध असतांना देखील वैजापूर मतदारसंघातील काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश करण्यात आला. यात सर्वाधिक महत्वाची भूमिका सतीश चव्हाण यांची असल्याचा आरोप चिकटगावकर यांनी केला आहे. त्यातच पक्षात राहायचं की नाही याबाबत आगामी 15 दिवसांत निर्णय घेणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांच्या याच निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.