(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad: 'सत्तार सरड्यासारखा, भुमरे चिल्लर'; आम्हीच ओरिजीनल असल्याचं म्हणत खैरेंची टीका
Aurangabad: माझ्यापेक्षा सत्तार यांना रुग्णालयात पाठवण्याची अधिक गरज असल्याचं देखील खैरे म्हणाले.
Chandrakant Khaire on Abdul Sattar: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे पुत्र आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज औरंगाबादच्या सिल्लोडमध्ये एकाचवेळी आमने-सामने येणार आहे. मात्र त्यापूर्वी शिंदे गट आणि ठाकरे गटाचे नेते एकेमकांवर हल्लाबोल करतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान अशीच काही खोचक टीका ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी शिंदे गटाच्या नेत्यांवर केली आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) सरड्यासारखे असून, रोहयो मंत्री संदिपान भुमरे (Sandipan Bhumre) चिल्लर असून, आम्हीच ओरिजीनल असल्याचं म्हणत खैरे यांनी टीका केली आहे.
यावेळी 'एबीपी माझा'शी बोलतांना खैरे म्हणाले की, अब्दुल सत्तार हे शिवसेनेत आत्ताच आले. आम्ही मजबूत आहोत, ओरिजीनल आहोत, निष्ठावंत आहोत, एकनिष्ठ असून हे चिल्लर आहे. सत्तार हे माझे विरोधक होते आणि ते आत्ताच आले व पुन्हा फुटले. सत्तार हे सरड्यासारखे रंग बदलतात आणि भुमरे यांना मोठं करण्यामध्ये आम्हीच प्रयत्न केले. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे आशीर्वाद विसरून भुमरे आज त्यांच्याच विरोधात बोलतायत. कधीकाळी ठाकरे कुटुंबाच्या मागे-पुढे करणारे आज आदित्य ठाकरे यांची सभा होऊ देऊ नका म्हणत असल्याचे खैरे म्हणाले.
माझ्यापेक्षा सत्तार यांना रुग्णालयात पाठवण्याची अधिक गरज...
श्रीकांत शिंदे यांच्या सभेला एक लाख लोकं येथील असा दावा अब्दुल सत्तार यांनी केला असल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना खैरे म्हणाले की, अब्दुल सत्तार फक्त दावे करतात, त्यांना दुसरे काही काम नाही. काल त्यांचे काही समर्थक मला भेटले असतांना, म्हणाले की आदित्य ठाकरेंच्या कार्यक्रमाला जागा मिळू देऊ नयेत यासाठी सत्तार यांच्याकडून प्रयत्न करण्यात आले. सत्तार यांच्या या भुमिकेमुळे अनेक शिंदे गटाचे लोकं आमच्यासोबत येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला ज्याप्रमाणे पैसे देऊन लोकं जमा केले होते, त्याचप्रमाणे आत्ताही पुन्हा करतील. मला रुग्णालयात पाठवण्याची गरज असल्याचं म्हणणाऱ्या सत्तार यांना अधिक रुग्णालयाची गरज आहे. मागे ते एकदा रुग्णालयात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांना कोणता आजार झाला होता हे एकदा त्यांना विचारून पहा असा टोला खैरे यांनी लगावला.
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंना मिळणार मुस्लीम कार्यकर्त्यांकडून हटके गिफ्ट, 'सस्पेन्स कायम'