Chandrakant Khaire: मी शिवसेनेचा वाघ, शिकारीसाठी मला दोन बोके दिसतायत; चंद्रकांत खैरेंचा भाजपच्या 'या' दोन नेत्यांवर निशाणा
लोकं मला खासदार म्हणतात त्यामुळे मी सुद्धा खुश होतो की, लोकं मला खासदार समजतात असं चंद्रकांत खैरे म्हणाले.
Chandrakant Khaire On BJP leader: आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांपूर्वी शिवसेना-भाजप पुन्हा एकदा आमने-सामने आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप करण्याची कोणतेही संधी सोडत नसल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकात खैरे (Chandrakant Khaire) यांनी पुन्हा एकदा भाजपचे नेते तथा केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड (bhagwat karad) आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) यांच्यावर निशाणा साधला आहे. 'मी शिवसेनेचा वाघ असून, मी शिकार करू शकतो. अनेकांची शिकार केली आहे. मला दोन बोके दिसतायत त्यांची मी शिकार करणार,' असा खोचक टोला खैरे यांनी दानवे आणि कराड यांचे नाव न घेता लगावला आहे.
राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर पहिल्यांदाच बोलताना खैरे म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) म्हणजेच पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला तो माझ्यासाठी महत्वाचा आहे. संजय पवार सुद्धा जुने आणि कडवट शिवसैनिक आहेत. राजेंसमोर एक मजबूत शिवसैनिकाला संधी दिल्याने आम्हाला याचा अभिमान आहे. त्यामुळेच मी उद्धव ठाकरेंच अभिनंदन आणि कौतुक करेल. आपल्या नशिबात जे असतं ते होईल. माझ्या मनात काहीच किंतु-परंतु नाही. म्हणूनच उद्धव ठाकरेंचा आदेश आम्हाला मान्य आहे.
लोकं मला खासदार म्हणतात...
मी जरी आज खासदार नसलो तरीही मी खासदारपेक्षा अधिक काम करतो. माझ्यासमोर हे कुणीही काम करत नाही. अनेक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. लोकं मला खासदार म्हणतात त्यामुळे मी सुद्धा खुश होतो की, लोकं मला खासदार समजतात.तर पुढच्या लोकसभेच्या उमेदवारीच काही वचन मिळाले का ? असं विचारताच हे इथं सांगायचं नसतं असे खैरे म्हणाले.
Rajya Sabha Election 2022: राज्यसभा निवडणुकीत खैरेंना पुन्हा डावलले
कोल्हापूरच्या पवारांना संधी
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून उमेदवार निश्चित झाला असून, कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना संधी मिळाली आहे. तर लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिवसेनेचे जेष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे याना दुसऱ्यांदा डावलण्यात आले आहे. सलग चारवेळा खासदार राहिलेल्या खैरेंना गेल्यावेळी सुद्धा राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारी देताना डावलण्यात आले होते. त्यांनतर त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आता पुन्हा एकदा संधी हुकलण्याने खैरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र पक्षश्रेष्ठीने जो आदेश दिला तो माझ्यासाठी महत्वाचा असल्याचं खैरे म्हणाले आहे.