Aurangabad: भूमरेंच्या समर्थनात केलेलं शक्तिप्रदर्शन ठरला फुसकाबार; शिवसैनिकांनी फिरवली पाठ
Aurangabad News: भुमरे यांच्या कार्यकर्त्यांकडून मोठ्या संख्येत जमण्याचे आवाहन शिवसैनिकांना करण्यात आले होते.
Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीत सामील झालेले पैठणचे शिवसेना आमदार तथा रोहियो मंत्री संदीपान भुमरे यांच्या समर्थनात पैठणमध्ये आज शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याने भूमरेंच्या समर्थनात केलेलं शक्तिप्रदर्शन फुसकाबार ठरल्याची चर्चा पाहायला मिळत आहे. जेमतेम कार्यकर्त्यांनी यावेळी हजेरी लावली. तर त्यापेक्षा पाहणाऱ्यांची संख्या अधिक होती. त्यामुळे भुमरे यांच्या बंडखोरीमुळे पैठणच्या शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.
सकाळी दहा वाजेच्या सुमरास शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ शिवसैनिकांना एकत्र येण्याचे आवाहन भुमरे समर्थकांकडून करण्यात आले होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या भूमरे यांच्या समर्थनात आणि शिंदे यांना पाठिंबा देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात या शक्तिप्रदर्शनाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवली.
पैठण शिवसेनेचा बालेकिल्ला...
पैठण मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. आतापर्यंत भुमरे यांना याच मतदारसंघात शिवसेनेच्या तिकीटावर पाचवेळा विजय मिळाला आहे. तर जिल्हा परिषद,पंचायत समिती आणि तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायत सेनेच्या ताब्यात आहे. पण असे असताना भुमरे यांच्या शक्तिप्रदर्शनाकडे शिवसैनिकांनी पाठ फिरवल्याने त्यांचा निर्णय सर्वसामान्य शिवसैनिकांनी पटला नसल्याची चर्चा आहे.
Maharashtra Political Crisis: संदीपान भुमरेंच्या फोटोला काळे फासले; शिवसैनिक आक्रमक
धनुष्यबाण गायब...
भुमरे यांच्या समर्थनात पैठण येथे काढण्यात रॅलीत फक्त भगवे झेंडे पाहायला मिळाले. नेहमी झेंड्यावर असलेला धनुष्यबाण मात्र यावरून गायब होता. तसेच यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. तर उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख टाळण्यात आला. त्यामुळे अनेक शिवसैनिकांनी काढता पाय घेतल्याची चर्चा आहे.
पोलिसांचा बंदोबस्त...
भुमरे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत त्यांच्या कार्यालयाजवळ असलेल्या त्यांच्या होर्डिंगवर काळे फासले. त्यांनतर भुमरे यांच्या कार्यालय आणि घरावर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. ज्यात पैठण,पाचोड,औरंगाबाद येथील घरांचा समावेश आहे.