Aurangabad Crime: औरंगाबाद शहर पोलिसांकडून रेकॉर्डवरील मोटारसायकल चोरट्याला बेड्या, सहा दुचाकीही जप्त
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहर पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीन लाखांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत.
Aurangabad Crime News: औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ पाहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा चोरट्यांच्या शोध घेऊन कारवाई केली जात आहे. दरम्यान औरंगाबाद शहर पोलिसांनी अशीच कारवाई करत तब्बल तीन लाखांच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. तर याप्रकरणी पोलिसांनी एकाला बेड्या ठोकल्या आहेत. प्रदीप बाबुराव जाधव, (वय 24 वर्षे रा. गल्ली नं. 5, संजयनगर, मुकुंदवाडी, औरंगाबाद) असे रेकॉर्डवरील मोटारसायकल चोराचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असतांना गस्तीवरील पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, एका व्यक्तीने चिखलठाणा विमानतळ भिंतीच्या विरुद्ध दिशेला रिकाम्या प्लॉटवर, संघर्षनगर येथे चोरीच्या मोटार सायकली विक्री करण्यासाठी ठेवलेल्या आहे. त्यावरून गस्तीवरील पथक तात्काळ मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी पोहोचले. यावेळी मिळालेल्या माहितीतील वर्णनाप्रमाणे एक व्यक्ती व रिकाम्या प्लॉटवर मोटारसायकली लावलेल्या दिसल्या.
पोलिसांना त्या व्यक्तीवर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन त्याची विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव प्रदीप बाबुराव जाधव असे सांगितले. त्यानंतर त्यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकल कोणाच्या आहेत आणि याची कागदपत्रे कुठे आहेत याबाबत चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याच्या ताब्यात मिळुन आलेल्या मोटार सायकली पो.स्टे. मुकुंदवाडी व पो.स्टे. MIDC सिडको हद्दीतुन चोरी केल्याचं त्याने कबूल केले. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कारवाईत प्रदीप जाधवकडे चोरीच्या तीन लाख 10 हजारांच्या 6 मोटारसायकल मिळून आल्या आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेने त्याला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी मुकुंदवाडीपोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
मोटरसायकल चोरीच्या घटना वाढल्या....
गेल्या काही दिवसांपासून शहरात दुचाकी चोरीच्या घटना सतत वाढतांना पाहायला मिळत आहे. दरम्यान पोलिसांकडून सतत कारवाई देखील केल्या जात आहे. मात्र सद्या शहरात मोटारसायकल चोरट्यांची संख्या अधिक झाली असल्याचे दिसून येत आहे. तर अनेकदा शहराबाहेरील चोरटे देखील शहरात दुचाकी चोरत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे शाईन सारख्या गाड्यांची अधिक चोरी होत असल्याचे देखील समोर आले आहे.
मॉलमधील पार्किंग निशाण्यावर
काही दिवसांपूर्वी पोलिसांनी केलेल्या एका कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दुचाकी सर्वाधिक मॉलमधील पार्किंगमधून चोरण्यात आल्याचे समोर आले होते. त्यामुळे सद्या शहरातील वेगवेगळे मॉलमधील पार्किंग दुचाकी चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी गाडी पार्किंगला लावतांना काळजी घेण्याची गरज आहे.