chandrakant khaire: एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांवर जादूटोणा केलाय; खैरेंचा अजब दावा
Aurangabad News: खैरे यांच्या या विधानाने खळबळ उडाली असून, त्यांच्या या अजब दाव्याची जोरदार चर्चा आहे.
Maharashtra political crisis: शिवसेना विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल सेनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अजब दावा केला आहे. शिवसेना बंडखोर आमदारांना घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदेंना जादूटोणा येत असल्याचं विधान खैरे यांनी केला आहे. वैजापूर येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात बोलतांना खैरे यांनी हे विधान केले आहे. त्यामुळे खैरे यांच्या विधानाची जोरदार चर्चा आहे.
वैजापूर तालुक्याचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघात आज शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी बोरणारे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, त्या गुवाहाटीत काय चालू आहे. आमदारांना कसं बेकार करून ठेवलंय. त्यांच्यावर जादूटोणा करण्यात आला आहे. कारण एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात. त्यांच्या तोंडामध्ये सतत एक कोणतीतरी पांढरी गोळी असते. म्हणून त्यांनी जादूटोणा करून या लोकांना आपलंसं करून घेतलंय, असा दावा खैरे यांनी केला आहे.
सत्तार यांच्यावरही टीका...
यावेळी पुढे बोलतांना खैरे यांनी शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर सुद्धा निशाणा साधला. अब्दुल सत्तार हे माझे विरोधक आहेच. म्हणूनच मी त्यांना हिरवा साप म्हणतो, पण आता भाजपवाले म्हणायला लगले आहे की, सत्तार आता भगवे झाले आहेत का? , त्यामुळे सत्तार हे कुणाचेच नाही असेही खैरे म्हणाले.
बंडखोरांच्या मतदारसंघात मेळावे...
शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बंडखोर आमदार यांच्यातील वाद काही मिटता-मिटत नसून प्रकरण आता थेट न्यायालयात जाऊन पोहचले आहे. एकीकडे कायदेशीर लढाई सुरु असताना दुसरीकडे शिवसेनेने रस्त्यावरील लढाई सुद्धा सुरु केली. दरम्यान वैजापूर मतदारसंघाचे शिवसेना आमदार आणि एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेले रमेश बोरणारे यांच्या वैजापूर मतदारसंघात आज शिवसेनेने मेळावा आयोजित केला होता. विशेष म्हणजे या पुढे सर्वच बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना मेळावे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांतील वाद आणखी तापणार असल्याचे चित्र आहे.