Jalna: कार्यकर्त्यांच्या लग्नात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी धरला अंतरपाट
Raosaheb Danve: यानिमित्ताने पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांचा साधेपणा पाहायला मिळाला.
![Jalna: कार्यकर्त्यांच्या लग्नात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी धरला अंतरपाट maharashtra News Aurangabad Attendance of Raosaheb Danve at the wedding of party workers Jalna: कार्यकर्त्यांच्या लग्नात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी धरला अंतरपाट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/03/017db4f84ab27d961ab5d62a09e6fad4_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jalna News: राज्यात सत्तास्थापनेचा गोंधळ सुरु आहे. कोण कुणाचे आमदार कधी पळून नेईल याचा अंदाज नाही. या सर्व गोंधळात भाजप सुद्धा आघाडीवर आहे. मात्र असे असताना भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यापासून दोन हात दूर राहणे पसंद केले आहे. विशेष म्हणजे दानवे भोकरदन येथे आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या मुलांच्या लग्नात वधू-वराच्यामध्ये अंतरपाट धरून उभा राहिल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे त्यांच्या याच साधेपणाची पुन्हा एकदा चर्चा पाहायला मिळत आहे.
भोकरदनच्या जालना रोडवरील कमल लॉन्समध्ये आज आकांक्षा आणि उमेश यांचा थाटामाटात विवाहसोहळा पार पडला. पण या लग्नात चर्चा होती ती वधू-वराच्यामध्ये अंतरपाट धरून उभा असलेल्या व्यक्तीची. कारण हे व्यक्ती दुसरा तिसरा कुणी नसून केंद्रीय मंत्री दानवे होते. अंकाशाचे वडील गजानन वराडे आणि उमेशचे वडील जगन्नाथ पाचरणे हे दोन्ही पण दानवे यांचे कट्टर समर्थक समजले जातात. त्यामुळे सर्व काम सोडून दानवे यांनी लग्नाला हजेरी लावली. फक्त हजेरीच नाही तर, ते वधू-वराच्यामध्ये अंतरपाट धरून सुद्धा उभा राहिले.
आणि सर्वांचे लक्ष दानवेंकडे...
वधू-वर स्टेजवर आले. वरात लग्नमंडपात आल्यावर लग्नकार्यास सुरवात झाली. पुरोहित यांनी वधू-वरांच्यामध्ये अंतरपाट धरून उभा राहण्याच्या सूचना दिल्या. यावेळी रावसाहेब दानवे यांनी एकाबाजूने अंतरपाट धरला. हे पाहून लग्नमंडपात उपस्थितांना आश्चर्याचा धक्काच बसला. मात्र यावेळी दानवे यांनी संपूर्ण मंगलाष्टक होईपर्यत व्यासपीठावर अंतरपाट धरत ठाण मांडलं. त्यांच्या हाच साधेपणा लग्नमंडपात चर्चेचा विषय ठरला.
पुन्हा एकदा पाहायला मिळाला साधेपणा....
रावसाहेब दानवे यांची बोलीभाषा आणि त्यांचा साधेपणाची चर्चा राज्यातच नव्हे तर देशभरात आहे. केंद्रीय मंत्री पद मिळाल्यानंतर सुद्धा दानवे यांचे राहणीमान सर्वसामान्य लोकांप्रमाणे आहे. आजही ते ग्रामीण भागात फिरताना गावकऱ्यांमध्ये बसून त्यांच्या समस्या जाणून घेतात. कार्यकर्त्यांना सुद्धा दानवे आपलेसे वाटतात. त्यांच्या साध्यापणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मात्र आता पुन्हा एकदा कार्यकर्त्यांच्या मुलांच्या लग्नात अंतरपाट घेऊन उभा असलेल्या दानवेंचा साधेपणा पाहायला मिळाला.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)