शपथविधीची तारीख जाहीर होताच भाजपची जय्यत तयारी सुरू, 15 हजार पासेस तयार, बैठकाही झाल्या
Maharashtra New CM : शपथविधीचा मुहूर्त जरी ठरला असला तरी मुख्यमंत्रिपदाचं नाव मात्र अद्याप जाहीर करण्यात आलं नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
मुंबई : महायुती सरकारच्या शपथविधीची नवी तारीख समोर येताच भाजपकडून शपथविधीची जय्यत तयारी सुरू करण्यात आल्याचं दिसतंय. महायुतीचा सरकारचा हा शपथविधी भव्य स्वरुपाचा असणार आहे. भाजप पदाधिकारी आणि महत्वाच्या नेत्यांसाठी 15 हजार पासेस तयार करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच शपथविधीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळेंकडून बैठकांचं सत्रही सुरू झालं. महायुतीचा शपथविधी हा 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी शनिवारी राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष आणि आमदारांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन स्वतंत्र बैठका घेतल्या. मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राज्यभर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पास असणाऱ्यांनाच देण्यात आलेल्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाईल.
शपथविधी 5 डिसेंबर रोजी
महायुतीच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला असून 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता भाजपचा मुख्यमंत्री शपथ घेणार आहे. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्रिपदाचं नाव अद्याप जाहीर केलं नसलं तरीही देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील हे आता जवळपास निश्चित झालं आहे.
एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली असून ते शुक्रवारपासून साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी आहेत. तब्येत बरी नसल्याने शिंदेंना आराम करण्याचा डॉक्टरांनी सल्ला दिल्याची माहिती आहे. त्यांच्यावर चार जणांचं पथक उपचार करत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. यादरम्यान जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील आणि दीपक केसरकर शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. मात्र एकनाथ शिंदेंनी भेटण्यासाठी नकार दिला.
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा
राज्यात सत्तास्थापन करण्यात आपला कोणताही अडथळा येणार नाही असं सांगणारे एकनाथ शिंदे अचानक आपल्या साताऱ्यातील दरे गावात मुक्कामाला गेलेत. त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. तर काहींनी त्यांची तब्येत बरी नसल्याचं सांगितलं. शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाटांनी मात्र एकनाथ शिंदेंना मोठा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते दरे गावात जातात असं सांगितलं. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय मोठा निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे.
राज्यात महायुती सरकारच्या शपथविधीच्या तारखाबाबत क्षणाक्षणाला अपडेट्स येत असताना शिवसेना-भाजपमध्ये खातेवाटपावरूनही सुरू असलेले दावे समोर येऊ लागलेत. मुख्यमंत्रिपद भाजपकडे गेल्यानंतर आता शिंदेंची शिवसेना गृहखात्यासाठी आग्रही असल्याची माहिती आहे. मागच्या सरकारमध्ये जसं गृहखातं उपमुख्यमंत्र्यांकडे होतं, त्याच फॉर्म्युल्यानुसार आताही तसंच व्हावं अशी मागणी शंभुराज देसाईंनी केली. तर संजय शिरसाटांनी नैसर्गिक नियमाप्रमाणे गृहखातं शिवसेनेकडेच असेल असा दावा केला आहे.
ही बातमी वाचा: