Ajit Pawar: नंतर आलेल्या अजित पवारांवर भाजप जास्त मेहेरबान... पहिली सलामी दिलेला शिंदे गट बाजूला?
Maharashtra Cabinet : खातेवाटपात अजित पवार यांच्या गटाला अर्थ, सहकार, कृषी आणि इतर महत्त्वाची खाती देण्यात आली आहेत.
मुंबई: कुणाच्याही ध्यानीमनी नसताना अजित पवार (Ajit Pawar) सत्तेत आले काय आणि त्यांनी अर्थ, सहकार आणि इतर मलईदार खाती घेतली काय... पाहता पाहता हे सगळं घडलं. पण यामुळे शिवसेनेत बंड करून वर्षभरापूर्वी सत्ता स्थापन केलेल्या शिंदे गटात (Eknath Shinde Shivsena) मात्र चांगलीच अस्वस्थता असल्याचं दिसून आलं. एक तर मंत्रिपदासाठी आमदारांना रोज वाट पाहावी लागतेय, त्यातच नंतर आलेल्या अजित पवार गटाने इतक्या जलदगतीने नऊ महत्त्वाची कॅबिनेट खाती (Maharashtra Cabinet Expansion) पारड्यात पाडून घेतली. यावरून सत्तेतील प्रमुख पक्ष असलेला भाजप हा शिंदे गटापेक्षा अजित पवारांवर जास्त मेहेरबान असल्याचं दिसून येतंय का अशी चर्चा सुरू आहे.
गेल्या वर्षी एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार महाविकास आघाडी सरकार पाडून, शिवसेनेत बंड करून भाजपसोबत गेले. भाजपसोबत जाताना त्यांनी सांगितलेले महत्त्वाचे कारण म्हणजे... अजित पवार आम्हाला निधी देत नाहीत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत असताना अजित पवार हे राज्याचे अर्थमंत्री होते. त्यावेळी ते सत्तेतल्या शिवसेना आणि काँग्रेसला डावलून सगळा निधी राष्ट्रवादीकडे कसा खेचून आणतात याचा पाढाच त्यावेळचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मांडला होता.
शिवसेना-भाजपने सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचा मुख्यमंत्री झाला पण नऊ मंत्र्यांनी म्हणावी तशी खाती देण्यात आली नव्हती. यावरून भाजपने फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच खूष करून बाकीच्यांची बोळवण केल्याचीही चर्चा होती. त्यानंतर गेल्या वर्षभरापासून सेनेच्या उर्वरित इच्छुकांना रोज मंत्रिपदाची शपथ घेतातानाची स्वप्ने पडतात. भरत गोगावले, संजय शिरसाठ, संजय बांगर, बच्चू कडू असे कितीतरी आमदार हे आपण उद्याच मंत्री होणार असे रोज माध्यमांना ठासून सांगत होते. पण त्यांचा उद्या काही उजाडत नव्हता.
कोणतीही मंत्रीपदं द्या... खरं एकदाचं मंत्री करा असा पवित्राच शिवसेनेच्या इच्छूक आमदारांनी घेतल्याचं चित्र होतं. हे सगळे आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारच बसले होते.
मंत्रिमंडळाच्या विस्तारासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान पाच-सहा वेळा तरी दिल्ली वारी केली. पण विस्ताराला काही मुहूर्त मिळत नव्हता. कदाचित अजित पवार आपल्या सोबत येणार आहेत याची खात्रीच भाजपच्या वरिष्ठांना असेल. त्यामुळेच त्यांनी सुरूवातीला भाजपचे आणि शिंदे गटाच्या नऊच मंत्र्यांना शपथ दिली आणि बाकी मंत्रिपदं रिक्त ठेवली.
अजित पवारांनी 2 जुलै रोजी आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. या नऊ जणांमध्ये सर्वच्या सर्वच मातब्बर नेते, या आधी कुणी उपमुख्यमंत्रीपद तर कुणी गृहमंत्री, अर्थमंत्री अशी पदं भूषवली होती. आता ती मंत्रिमंडळात आल्यानंतर त्यांचा उचित सन्मान करणे भाजपला क्रमप्राप्त होतं. त्यामुळेच त्यांना सर्वांनाच कॅबिनेटपदाची शपथ देण्यात आली.
खातेवाटपात झुकते माप
मंत्रिमंडळाचे खातेवापट जाहीर झाल्यानंतर सर्व चित्र समोर आलं. जे शिंदेंना पाच-सहा वेळा दिल्लीला जाऊन जमलं नव्हतं ते अजित पवारांनी एकाच दिल्लीवारीत करून दाखवलं. अजित पवार दिल्लीत गेले, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आणि त्यांनी थेट अर्थमंत्री, सहकारमंत्री, कृषीमंत्री अशी महत्त्वाची पदं पदरात पाडून घेतली.
अजित पवार सत्तेत आल्यानंतर आधीच वैतागलेल्या शिंदे गटाला आता हा नवीनच धक्का आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकार सुरळीत सुरू असताना ते भाजपकडे आले... पण त्यांना मंत्रिपदासाठी झुलवत ठेवण्यात आलं. नंतर आलेल्या अजित पवार गटाला मात्र एका दमात नऊ मलईदार मंत्रिपदं देण्यात आली.
या सर्व प्रकारानंतर एकच स्पष्ट होतंय की भाजपचे दिल्लीतील नेते अजित पवार गटावर जास्तच मेहेरबान आहेत. त्यांनी मागितलेली खाती त्यांना देण्यात आली. राज्याची आर्थिक नाडी असलेल्या अर्थखात्याचा कारभार देण्यात आला. मात्र काहीही द्या... काहीतरी द्याच असा पवित्रा घेतलेल्या शिंदे गटाच्या आमदारांना मात्र अजूनही झुलवत ठेवलं जातंय.
ही बातमी वाचा :