Nashik Shivsena : माझं वय 72 पण, ज्या दिवशी गद्दारी झाली, त्यादिवशी माझे वय 27 झालं, असं कोण म्हणाले...
Nashik Shivsena : आत्ताचे सरकार हे औटघटकेचे असून हे सरकार भाजपच पाडणार असल्याचे सूचक विधान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांनी केले आहे.
Nashik Shivsena : माझं वय 72 आहे पण ज्या दिवशी गद्दारी झाली, त्यादिवशी माझे वय 27 झाले. युवकांना लाजवेल अस ज्येष्ठांनी आता बाहेर पडायचे आहे. अखंड महाराष्ट्रात ज्येष्ठ शिवसैनिक बाहेर पडले आहेत. चिंता करू नका आत्ताचे सरकार हे औटघटकेचे असून हे सरकार भाजपच पाडणार असल्याचे सूचक विधान शिवसेना नेते अनंत गीते (Anant Gite) यांनी केले आहे.
नाशिकमध्ये (Nashik) शिवगर्जना अभियानास सुरवात झाली. या अभियानाच्या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना नेते अंनत गीते बोलत होते. ते म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नंदुरबार, धुळे, नाशिक या ठिकाणी शिवगर्जना अभियान (Shivgarjana Abhiyan) राबविण्यात येत आहे. शिवसैनिकांचा आत्मविश्वास द्विगुणित करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. मी जन्मजात शिवसैनिक आहे. शिवसेनेशिवाय दुसरा कुठलाच अंश माझ्या रक्तात नाही. शिवसेना संकटात येत आहे, असं वाटत असताना, शिवसेना जगविणे हे नैतिक कर्तव्य आहे..कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविणे, हा या दौऱ्याचा हेतू आहे..शिवसैनिक पेटला तर त्याला कुणीच थांबवू शकत नाही. नाशिककर आणि नाशिकची जनता उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्यासोबत आहे. आजची सभा त्याचे उदाहरण आहे. जर हिम्मत असेल तर नाशिक महापालिकेची निवडणूक आताच घेऊन दाखवा, मी खात्रीने सांगतो की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा महापौर निवडून येईल, असा विश्वास अनंत गीते यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले कि, संजय राऊत हे पक्षासाठी काही निर्णय घेतात, त्याचे कधी कधी त्यांना परिणाम भोगावे लागतात. पण ते खंबीरपणे उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या मागे उभे आहे. उद्धव ठाकरे यांची कोकणात विराट सभा होईल. त्यात या अलिबाबा चाळीस चोर यांचा नामशेष होईल. पुढच्या टप्प्यात नाशिकमध्ये सभा होईल. तसेच कसबा चिंचवड पोटनिवडणुकीत या दोन्ही जागा महाविकास आघाडी जिंकेल. पुणेकर जनता भाजप आणि विश्वासघातकी लोकांना जागा दाखवेल. विरोधक सगळे प्रयोग करत आहे, त्यांनी कोणताच प्रयोग शिल्लक ठेवला नसल्याचे गीते म्हणाले.
गीते पुढे म्हणाले कि, जे झालं ते जाऊद्या, पण आता आपल्याला पुन्हा एकदा शिवसैनिक जोडणे महत्वाचे आहे. त्यासाठी हे शिवगर्जना अभियान राबविण्यात येत आहे. 15 दिवसांपूर्वी शिवसेना भवनात बैठक झाली, पक्षप्रमुख उद्धव साहेब बोलले की मी आता खचणार नाही, कितीही आघात येवो, आता आपल्याला लढायचं आहे. त्यासाठी ही शिवगर्जना, तिथेच हा निर्णय घेतला. साहेबांनी आदेश देताच आम्ही 15 मिनिटात बैठक घेऊन चार जिल्ह्यांचा दौरा फिक्स केला. उद्धव ठाकरे यांची पहिली जाहीर सभा 5 मार्चला संध्याकाळी 5 वाजता कोकणात खेडला होणार असून अखंड कोकणातील आजपर्यंत झालेल्या सर्व सभापेक्षा विराट सभा होणार आहे.
आपला पक्ष ठाकरे कुटुंब, आपलं चिन्ह ठाकरे कुटुंब
जनतेच्या मनात संताप असून भाजपला कळून चुकलं आहे की या गद्दारांच्या नादी लागून आपल्यालाही महाराष्ट्राबाहेर पळावे लागेल. मी आजवर अनेक संकट बघितली पण हे संकट भाजप पुरस्कृत आहे, याच्या दोऱ्या भाजपच्या हातात आहे, भाजप शिंदे गटाला नाचवतं आहे, बाळासाहेबांनी कोणतेही पद घेतले नव्हते, तरी ते सगळ्यांना बोटावर फिरवायचे. सत्तेसाठी कायपण हे सगळ्याच धोरण आहे. आता आपल्याला एकच निर्धार करायचा आहे, पक्ष नाव जाऊद्या. आमचा पक्ष ठाकरे कुटुंब, आपलं चिन्ह ठाकरे कुटुंब आहे. मी शपथ देतोय, आपण सगळ्यांनी घ्या. बाळासाहेबांच्या स्मृतीला वंदन करून शपथ घेतो की, आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, आदेशाचे तंतोतंत पालन करू, शिवसेनेवर ज्या फितुरांनी संकट आणले, त्यांना आगामी निवडणुकीत महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकू, असा निर्धार यावेळी गीते यांनी उपस्थित शिवसैनिकांना संबोधित करताना केला.
वरुण सरदेसाई म्हणाले...
शिवसेना फक्त ठाकरेंची असून कोणाच्या बापाची नाही. सगळं आधीच ठरले असून कार्यकर्ते गेले, नाव, चिन्ह सोडल म्हणजे शिवसेना संपली असं होत नाही. उद्धव ठाकरे यांना मानणारे सर्व शिवसैनिक आहेत. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना जे काही कामे केली ती आपल्याला पोहोचवायची आहेत. कोणी काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही. निवडणूका घ्यायला भाजप किंवा गद्दाराचा गट तयार नाही. आपल्याला संघटीत व्हावं लागेल, युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी आहे. शिवगर्जना अभियानाअंतर्गत मोठं काम आपल्याला करायचे आहे. प्रत्येक वॉर्ड आपल्याला पिंजून काढायचा असल्याचे आवाहन सरदेसाई यांनी केले आहे.