(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime : संतापजनक! नाशिक जिल्ह्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन अधीक्षक निलंबित
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) आदिवासी आश्रम शाळांचा (Nashik Ashram School) विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील (Nashik) आदिवासी आश्रम शाळांचा (Nashik Ashram School) विषय दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. अशातच पेठ तालुक्यातील भुवन येथील (Peth Taluka) आश्रमशाळेतील विद्यार्थिनींशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणी आश्रमशाळा अधीक्षकासह महिला अधीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. सदर घटनेमुळे पुन्हा एकदा आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा (Suragana), इगतपुरी, त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) आदी तालुक्यांसह इतर जिल्ह्यात हजारो आदिवासी बांधव (Trible Community) वास्तव्य करतात. म्हणूनच शासनाने संबंधित तालुक्यांत अनेक भागात आश्रमशाळा उभारली आहेत. यात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र गेल्या काही महिन्यात आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याच्या घटना समोर आलेल्या आहेत. त्यामुळे आदिवासी आश्रम शाळांतील विद्यार्थ्यांचा प्रश्न बिकट बनला आहे. अशातच पेठ तालुक्यातील भुवन येथील शासकीय आश्रमशाळेतील मुलीशी लैंगिक गैरवर्तन केल्याची घटना घडली होती. या संदर्भांत चौकशी करण्यात येऊन तथ्य आढळून आल्याने आश्रमशाळेचे अधीक्षक राहुल तायडे (Rahul Tayde) यांच्यावर प्रकल्प अधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.
पेठ तालुक्यातील भुवन येथील शासकीय आश्रमशाळेत (Government Ashram school) मुलीशी लैंगिक गैरवर्तन करण्यात आल्याची गोपनीय तक्रार प्रकल्प कार्यालयाला प्राप्त झाली होती. या तक्रारीची दखल घेत समितीने प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन चौकशी केली असता येथील अधीक्षकाने मुलीशी लैंगिक गैरवर्तन केल्याचे प्रथमदर्शनी समोर आले. याबाबत घेतलेले जाबजबाब आणि पुराव्यानुसार गैरकृत्य केल्याचे स्पष्ट झाल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. महिला बालकल्याण समिती तसेच आश्रमशाळांच्या विशाखा समितीकडूनही याप्रकरणाची चौकशी करण्यात आली होती.
आश्रमशाळेचे दोन्ही अधीक्षक निलंबित
दरम्यान संशयित अधीक्षकावर यापूर्वी अन्य एका आश्रमशाळेत देखील अशाच प्रकारच्या गुन्ह्याचा ठपका आहे. असे असतानाही त्यांच्याबाबत पुन्हा अशा तक्रारी आल्याने आणखी काही तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रकल्प अधिकारी जतीन रहमान यांनी सोमवारी याबाबत निलंबनाचे आदेश काढले आहेत. तायडे याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्यानंतर, निष्काळजीपणाचा ठपका ठेवत, महिला अधीक्षिका प्रियांका ऊईके यांनाही निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे. त्या रजेवर असून, त्यांनी निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. महिला अधीक्षक या विनापरवानगी रजेवर असल्याने ही गंभीर बाब विचारात घेऊन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.