Nashik Crime : हरसूल हादरलं! दोघांचं सूत जुळलं, मात्र काहीतरी बिनसलं अन् दोघांनीही स्वतःला संपवलं
Nashik Crime : पेठ तालुक्यातील रहिवासी असलेल्या प्रेमी युगुलाने स्वतःला संपवल्याची घटना मंगळवार रोजी उघडकीस आली आहे.
Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात दिवसेंदिवस आत्महत्येच्या (Suicide) घटनांमध्ये वाढ होत असून यात अल्पवयीन मुला-मुलींचे प्रमाण अधिक असल्याचे वारंवार समोर येत आहे. अशातच आज जिल्ह्यात (Nashik District) अनेक आत्महत्याच्या घटना समोर आल्या आहेत. यात एका प्रेमी युगुलाचा देखील समावेश आहे. तर जिल्ह्यातील सहा पोलीस स्टेशन अंतर्गत सहा जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
दरम्यान नाशिक (Nashik City) शहरातील एका खाजगी शाळेतील स्कुल बसच्या वाहकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. नितीन यशवंत लोहकरे असे या तरुणाचे नाव असून याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात (Sarkar Wada Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लोहकरे मूळचा निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर येथील असून त्याने स्टाफ कॉर्टर्समध्ये कापडी पट्ट्याच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तर शहरातील दुसरी घटना ही नाशिकरोड भागातील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. शिवाजीनगर परिसरातील ड्रीम घरकुल हाऊसिंग सोसायटीत राहणारा युवक आदित्य पांडुरंग यांनी सकाळी राहत्या घरातील बेडरूम मध्ये गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. मोजाड याच्या आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नसून उपनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तर त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) तालुक्यातील हरसुल पोलीस ठाणे (Harsul Police Station) अंतर्गत येणाऱ्या शेंडेपाडा शिवारात प्रेम प्रकरणातून एका प्रेमी युगुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. हरसूल गावापासून काही अंतरावर असलेल्या शेंडेपाडा शिवारातील जंगलात पेठ तालुक्यातील रहिवासी असलेल्या तरुण-तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवार रोजी उघडकीस आली. दोघांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. योगेश भाऊराव वळवी आणि एका अठरा वर्षीय मुलीचा समावेश आहे. या दोघांनी हरसूलजवळील शेंडेपाड्याच्या शिवारातील जंगलातील झाडाच्या एकाच फांदीला अंगावरील ओढणीच्या साहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली.
एकाच दिवशी आठ जणांच्या आत्महत्या
दरम्यान दोघांनी प्रेम प्रकरणातून आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत असले तरी याबाबतचे निश्चित कारण उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हते. हरसूल पोलिसांना ग्रामस्थांनी या घटनेची माहिती दिली. सहायक पोलिस निरीक्षक गणेश मस्के व पथकाने घटनास्थळी भेट दिली. हरसूल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. हरसूल पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान जिल्ह्यातील वाडीवऱ्हे पोलीस स्टेशन, लासलगाव पोलीस स्टेशन, जायखेडा पोलीस स्टेशन, घोटी पोलीस स्टेशन, मनमाड शहर पोलीस स्टेशन, सायखेडा पोलीस स्टेशन या पोलीस स्टेशन अंतर्गत एक एक आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे. हरसुल पोलीस ठाण्यात एका प्रेमीयुगुलाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.