Maharashtra Rain: राज्यभर पावसाची तुफान बॅटिंग, मुंबईत दोन दिवस ऑरेंज अलर्ट तर पुढचे पाच दिवस राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा
Maharashtra Mumbai Rain Updates:राज्यात आज मुंबई, ठाण्यासह विदर्भातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गडचिरोलीमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने आठ मार्ग बंद करण्यात आले आहेत.
Maharashtra Rain Updates: काही दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय झाल्याचं दिसून येतंय. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण दिवस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. तसंच मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार पवासाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पालघर, सातारा, पुणे आणि रायगडसाठी बुधवारी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गडचिरोली आणि चंद्रपुरात पुढील 48 तासात अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय.
मुंबईसाठी दोन दिवस ऑरेंज अलर्ट (Mumbai Rain Update)
मुंबई आणि ठाण्यात आज आणि उद्या अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील दोन्ही दिवस 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तळ कोकणात देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून सोबतच मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे.
नाशिककर अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत (Nashik Rain Update)
राज्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून नद्याही दुथडी भरून वाहत असल्याचं चित्र बघायला मिळतंय. तर दुसरीकडे जुलै महिन्याचा तिसरा आठवडा उलटून देखील नाशिककर पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्याचा धरणसाठा 73 टक्के होता. अनेक धरणांमधून विसर्गही सुरू करण्यात आला होता, मात्र यंदा जलसाठा फक्त 33 टक्के एवढा असल्याने चिंता व्यक्त केली जातेय.
पालघरमध्ये सकाळपासून पाऊस सुरू (Palghar Rain Update)
पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस सुरू असून पावसामुळे मुंबई आमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर नायगावजवळ पाणी साचल्यानं वाहचालकांना वाहतूक कोंडींचा सामना करावा लागतोय.
लोणावळ्यात विक्रमी पाऊस (Lonawala Rain Update)
लोणावळ्यात यंदाच्या मोसमातील विक्रमी पाऊस. गेल्या 24 तासांत तब्बल 214 मिलिमीटर पावसाची नोंद. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खूपच कमी पावसाची नोंद. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2 हजार 515 मिमी पाऊस बरसला होता.
बेळगावात जोरदार पावसाला सुरूवात (Belgaon Rain Update)
बेळगाव शहर आणि परिसरात सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून दमदार पावसामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. बेळगावात सोमवारी रात्रभर रिमझिम पाऊस सुरू होता. मंगळवारी सकाळी मात्र जोरदार पावसाला सुरुवात झाली. दमदार पावसामुळे वातावरण गारठून गेले. दिवसभर संततधार पाऊस सुरू असल्याने भात तसेच अन्य पिकांना जीवदान मिळाले आहे. पेरण्या झाल्या नंतर पावसाने दडी मारली होती.अधूनमधून रिमझिम पाऊस येत होता पण त्याचा पिकांना उपयोग झाला नाही. त्यामुळे पिके जागवण्यासाठी अनेकांनी विहिरीतील पाणी सोडून पिके वाचवली होती. मंगळवारी सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनता सुखावली आहे. संततधार पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आणि शहरातील सखल भागात पाणी साठलेले पाहायला मिळाले.
विदर्भात देखील विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, तर चंद्रपूर आणि गडचिरोलीसाठी ऑरेंज अलर्ट जारी
चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू (Chandrapur Rain Update)
चंद्रपुर शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. दीड महिना उलटून गेल्यावर देखील चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा बॅकलॉग आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ 25 टक्के पावसाची नोंद झाली असून मागील वर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यात 46 टक्के पाऊस पडला होता. आजचा पाऊस जिल्ह्यात सर्व दूर पडत असल्याने पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खोळंबलेल्या पेरण्यांना देखील गती मिळू शकेल.
गडचिरोलीमध्ये पर्लकोटा नदीला पूर, आठ मार्ग बंद (Gadchiroli Rain Update)
गडचिरोली जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे पर्लकोटा नदीला पूर आला आहे. त्यामुळं आलपल्ली- भामरागड मार्ग बंद झाला आहे तर काही छोट्या नाल्यांना पूर आल्याने इतर सात छोटे मार्ग बंद. जिल्ह्यात एकूण आठ मार्ग बंद झाले आहेत. दक्षिण गडचिरोली भागात पाऊसाचा जोर अधिक आल्याने या भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे..
पूरामुळे बंद झालेल्या मार्गांची स्थिती
1. अहेरी ते मुलचेरा मार्ग (गोमनी नाला)
2. खुदरामपल्ली आणि कोपरअल्ली मार्ग
3. एटापल्ली नाक्या समोरील मार्ग
4. बोलेपल्ली मार्ग (गेदा जवळ)
5. पाविमुरंडा च्या जवळील नाल्यावरील मार्ग
6. चामोर्शी ते माक्केपाली मार्ग (मछली नाला)
7. पोटेगाव च्या समोरील मार्ग
8. आलापल्ली ते भामरागड राष्ट्रिय महामार्ग (पर्लकोटा नदी)