Rain Update : मुंबईसह राज्यात आज दमदार पाऊस; येत्या 48 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबईला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain Update : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये दडी मारून बसलेल्या पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
मुंबई : महाराष्ट्रात अनेक दिवसांनी पावसानं हजेरी लावली. मुंबईसह पश्चिम उपनगरात आजप पावसाने जोरदार हजेरी लावली असून महाराष्ट्रातील अनेक भागातही आज पाऊस पडला. त्यामुळे राज्यातील बळीराजाही सुखावला आहे. पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसचे मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिली होती. मात्र हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे सप्टेंबर महिन्यात पाऊस येईल असं सांगण्यात आलं होतं. पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 15 सप्टेंबरच्या पुढे देखील पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबईमध्ये ऑरेंज अलर्ट
मुंबईच्या पश्चिम उपनगरात आज दिवसभरात मुसळधार पाऊस झाला. पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, वांद्रे, सांताक्रुज परिसरात सध्या पावसाची चांगली बॅटिंग सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर एक अर्धा तासांमध्ये पश्चिम उपनगरात असलेला सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होईल. पुढील दोन दिवस राज्यात सर्वत्र पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसचे मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली परिसरात मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. तसंच मुंबईत पावसाची तीव्रताही वाढण्याचा अंदाज आहे. आज मुंबईसह उपनगगरात जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं. तर मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही पावसाचा परिणाम झाला.
नाशिकच्या सप्तशृंगी गडावर आज पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे गडावरील सर्व धबधबे पुन्हा प्रवाहित झालेत. तर गडावर जाणारा घाट रस्ताही जलमय झाला असून रस्त्याला नदीचं स्वरुप आलं आहे.
भिवंडीत शहर आणि ग्रामीण भागात मुसळधार पाऊस
भिवंडी शहर तसेच ग्रामीण भागामध्ये रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील तीन बत्ती परिसरात गुडघाभर पाणी साचले असून पावसाचा जोर अजूनही कायम आहे. त्यामुळे परिस्थिती अजूनही बिकट होऊ शकते. तर शहरातील कामवारी नदी याची पातळी देखील वाढली आहे.
मालेगावात सलग दुसऱ्या दिवशी पाऊस
नाशिकच्या मालेगावात पावसाने सलग दुसऱ्या दिवशीही हजेरी लावली. नांदगाव, मनमाड भागातही काही गावांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. या पावसाने पावसाने काहीसा दिलासा मिळाला असला तरी बळीराजाला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
एक महिन्याच्या विश्रांती नंतर जळगाव जिल्ह्यात पावसाने पुन्हा आगमन केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे
जळगावात शेतकऱ्यांना दिलासा
जळगाव जिल्ह्यातील जळगाव शहरासह इतर भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे. गेल्या दीड महिन्यापासून जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. मात्र मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे काही प्रमाणात का होईना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तर गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाअभावी तापमान वाढल्याने उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते. मात्र जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याने वातावरण गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
पालघर जिल्ह्यात गेल्या 15 दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाल्याचं दिसून आलं.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची हजेरी, बळीराजा सुखावला
शेतकरी पावसाची आतुरतेने वाट बघत असतानाच आज दुपारपासून जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. सिंधुदुर्गातील कणकवली, वैभववाडी, कुडाळ, दोडामार्ग तालुक्यात पावसाची दमदार हजेरी लावली आहे. गेल्या महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. गेला महिनाभर गायब झालेल्या पावसामुळे भात शेतीला फटका बसला होता. अखेर महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर दुपारपासून जिल्ह्यात पावसाची दमदार सुरावात झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. पावसामुळे बळीराजा सुखावला आहे.
ही बातमी वाचा :