Maharashtra Mumbai Rain LIVE Updates : गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा कहर, ट्रक गेला वाहून, तीन जणांचा मृत्यू
राज्यात विविध ठिकाणी चांगलाच पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे.
LIVE
Background
Maharashtra Mumbai Rain Live : राज्याच्या विविध भागात पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. या पावसामुळं शेतकरी आनंदी असल्याचे दिसत आहे.
राज्यातील मुंबईसह, ठणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापुरात जोरदार पाऊस कोसळताना दिसत आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही चांगला पाऊस सुरु असल्याचं दिसत आहे. मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळं नदी नाले धुथडी भरुन वाहत असल्याचं चित्र दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत आहे.
राज्यात काही ठिकाणी सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. नदी नाल्यांना काही ठिकाणी पूर आले आहेत. तर मराठवाड्यात या पावसामुळं शेतीचं देखील मोठं नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पीकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
बुलढाणा पाऊस
बुलढाणा जिल्ह्यातील अनेक भागात रात्री देखील जोरदार पाऊस पडला. मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडल्याने अनेक नदी , नाल्यासह ओढ्यांना पूर आला आहे. अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर चांगला पाऊस झाल्यानं शेतकरी आनंदी आहेत.
वर्धा पाऊस
वर्धा जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला आहे. मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती झाली आहे. शहरालगत असलेल्या सालोड हिरापूर आणि धोत्रा या दोन गावाला जोडणाऱ्या नाल्याला नदीचे स्वरुप आले आहे. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळं शेतात गेलेल्या तेरा महिला व एक पुरुष पाण्यात अडकले होते. त्यांचा जीव धोक्यात अडकला होता मात्र, रात्रीच्या या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलं आहे.
चंद्रपूर पाऊस
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातील धक्कादायक घटना घडली. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी पुराच्या पाण्यात वाहून गेली. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला आलेल्या पुरात चालकाने हलगर्जीपणाने गाडी घातली होती. या गाडीत 5 प्रवाशी होते. गाडी पुराच्या पाण्यात वाहून जात असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी टपावर आश्रय घेतला. गावातील नागरिकांसह सैन्यात असलेल्या निखिल काळे या जवानाने घटनास्थळी धाव घेत भर पावसात बचावकार्य राबवले. स्थानिकांनी दाखवलेल्या धाडसाने सर्वच प्रवाशांची सुटका केली आहे.
हिंगोली
हिंगोली जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला. पहाटेच्या सुमारास उघडीप दिलेला पाऊस पुन्हा सुरु झाल्यामुळं शेतकऱ्यांसह नागरिकांची चिंता वाढली आहे. असाच आणखी काही दिवस पाऊस सुरु राहिला तर खरिपातील कोवळ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यवतमाळ : पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे पडले महागात, थोडक्यात बचावला जीव
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार
चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार, 48 तासांपेक्षा अधिक काळापासून कमी अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस, कोरपना तालुक्यातील धानोली तांडा क्रमांक 2 येथिल बारा ते पंधरा घरात शिरले पाणी, घरातील अन्नधान्य व सामानाचे झाले नुकसान, त्वरित मदत मिळावी अशी गावकऱ्यांनी केली मागणी, जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यात अड्याळ जानी येथे वीज पडून मासेमारी करणाऱ्या इसमाचा मृत्यू तर सावली शहरात देखील पावसामुळे काही घरांचे नुकसान
नंदूरबारमधील वडफळीच्या आश्रम शाळेत शिरलं नदीचं पाणी, 200 विद्यार्थ्यांना सुरक्षीतस्थळी हलवले
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वडफळीच्या आश्रम शाळेत नदीचे पाणी शिरलं आहे. त्यामुळं विद्यार्थी अडकून पडले होते. दरम्यान, या आश्रमशाळेतील 200 आदिवासी विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हालवण्यात आलं आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील धरणाच्या पाणी पातळीत वाढ
Buldhana Rain : गेल्या 7 दिवसापासून जिल्ह्यातील काही भागात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळं जिल्ह्यातील मोठ्या व माध्यम प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत चांगलीच वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात व परिसरात चांगला पाऊस झाल्यानं नद्या भरुन वाहत आहेत. त्यामुळं धरणातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. जिल्ह्यात तीन मोठे प्रकल्प आहेत. त्यामध्ये नलगंगा, खडकपूर्णा व पेनटाकळी यांचा समावेश आहे. तर 7 मध्यम प्रकल्प आहेत. यामध्ये ज्ञानगंगा, मस, कोराडी, पलंढग, मन, तोरणा व उतावली असे सात मध्यम प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पातील पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यानं जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटणार असल्याचे प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
नंदूरबार जिल्ह्यात वडफळीच्या आश्रमशाळेत घुसले नदीचे पाणी, दोरीच्या सहाय्यानं विद्यार्थ्यांना काढलं बाहेर
नंदूरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील वडफळी आश्रमशाळेत नदीचे पाणी घुसले आहे. जोरदार पावसामुळं देव नदी ओसंडून वाहत असून नदीचे पाणी आश्रम शाळेत शिरले आहे. आश्रम शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना दोरीच्या सहाय्याने पाण्यातून बाहेर काढले. तर काही विद्यार्थ्यांनी शाळेच्या तिसऱ्या मजल्यावर सहारा घेतला आहे. तर गाव परिसररातही पाणी घुसलं आहे.