MVA Mumbai Morcha : आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा, तिन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी
MVA Mumbai Morcha : आज सकाळी साडेदहा वाजता महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे.
MVA Mumbai Morcha : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.
'या' मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक
राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील होणार आहेत. हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं होतं.
मोर्चाला परवानगी मिळाली
दरम्यान, महाविकास आघाडीच्या या मोर्चाच्या परवानगीच्या मुद्यावरुन देखील राजकीय वातावरण चांगलच तापलं होतं मात्र, अखेर या मोर्चासाठी परवानगी देण्यात आली आहे. अनेक दिवस मोर्चाला परवानगीची प्रतीक्षा होती. आता मुंबई पोलिसांकडून मोर्चाला लिखित परवानगी देण्यात आली आहे. भायखळा येथील पोलीस ठाण्यातून ही परवानगी देण्यात आली आहे. शिष्टमंडळाच्या भेटीनंतर अटी, शर्टींसह ही परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत, मोर्चाला परवानगी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला गेला होता. परवानगी मिळाली नाही तरी आमचा मोर्चा होणारच असा पवित्रा देखील राजकीय नेत्यांनी घेतला होता.
भाजपचे माफी मांगो आंदोलन
आज एकीकडे मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा निघत असताना दुसरीकडं भाजपच्या वतीनं माफी मांगो आंदोलन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून हिंदू देवदेवता, महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मस्थळाचा वाद निर्माण करणाऱ्या शिवसेनेच्या विरोधातमुंबईसह राज्याच्या विविध भागांत भाजपकडून हे माफी मांगो आंदोलन केलं जाणार आहे.
अधिवेशनाच्या तोंडावर सरकारच्या विरोधात शक्तीप्रदर्शन
सोमवारपासून (19 डिसेंबर) सुरू होणाऱ्या विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधारी-विरोधकांमधील वाद अधिकच तीव्र झाला आहे. सत्ताबदल झाल्यानंतर विरोधी बाकावर बसायला लागलेल्या महाविकास आघाडीचे शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधातील हे पहिलेच मोठे शक्ती प्रदर्शन असणार आहे. तिन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे जोरदार तयारी केली असून राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत आणण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: