(Source: ECI/ABP News/ABP Majha)
MSRTC Staff Diwali Bonus : एसटी कर्मचाऱ्यांसाठी गोड बातमी, महागाई भत्त्यासह दिवाळी बोनस जाहीर
Maharashtra MSRTC Staff Diwali Bonus : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे.
Maharashtra MSRTC Staff Diwali Bonus : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली आहे. तसेच दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना पाच हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना दोन हजार 500 रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब (State transport minister Anil Parab) यांनी केली. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे 93 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. तसेच प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणार पगार यंदा मात्र नोव्हेंबरच्या एक तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे.
महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी 5 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता 17 टक्के होणार असल्याचे अनिल परब यांनी यावेळी सांगितले. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सकारात्मक सहकार्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे परब यांनी आभार मानले.
एसटीच्या तिकीट दरात 17 टक्क्यांची भाडेवाढ -
मागील काही दिवसांत सातत्याने वाढत जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किंमतींमुळे सर्वसामान्य माणूस हैराण असताना आता त्यामध्ये आणखी एका दरवाढीची भर पडली आहे. एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीत आज तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय झाला आहे. एसटी प्रति किलोमीटर 21 पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. पूर्वी प्रतिकिलोमीटर 1 रुपया 24 पैसे दर, आता प्रतिकिलोमीटर 1 रुपया 45 पैसे मोजावे लागणार. बैठकीत तिकीट दरात 17.17 टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तिकीटाचे नवे दर आज मध्यरात्रीपासून लागू होणार आहेत. रातराणी गाड्यांच्या तिकिटांचे दर 5 ते 10 रूपयांनी कमी करत रात्रीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा दिला आहे.