(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dhananjay Munde vs Mumbai Singer Case Live Updates: धनंजय मुंडे अडचणीत? पाहा प्रत्येक अपडेट
Dhananjay Munde vs Mumbai Singer Case Live Updates: बलात्काराचा आरोप व विवाहबाह्य संबंधाची स्वतःच दिलेली कबुली, यामुळे मंत्री धनंजय मुंडे अडचणीत आलेले आहेत. मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ, असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे.
LIVE
Background
Dhananjay Munde vs Mumbai Singer Case Live Updates: बलात्काराचा आरोप व विवाहबाह्य संबंधाची स्वतःच दिलेली कबुली, यामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या बैठकीत धनंजय मुंडे यांची पाठराखण केली असली तरी मुंडे यांच्या भवितव्याचा अंतिम निर्णय शरद पवार घेणार आहेत. 'धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ', असं सूचक वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. त्यानंतर धनंजय मुंडे यांना याविषयी विचारलं असता ते म्हणाले की, शरद पवार आणि पक्ष नेतृत्व विचार करुन निर्णय घेतील. याबाबत मी स्वता शरद पवार यांना भेटलो आहे. त्यांना स्पष्टीकरण दिलं आहे. सर्व सविस्तर माहिती दिली आहे. तसंच या प्रकरणाची सर्व माहिती मी प्रसारमाध्यमांना दिली आहे, असं धनंजय मुंडे म्हणाले.
धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर : शरद पवार
धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. याबाबत मुंडे यांनी आपली बाजू स्पष्ट केली असून ब्लॅकमेलिंगच्या उद्देशाने आरोप होत असल्याचं म्हटलं. परंतु विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का, याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, "धनंजय मुंडे यांनी काल मला भेटून आरोपांची सविस्तर माहिती दिली. त्यांच्या माहितीनुसार त्यांचे काही व्यक्तींशी घनिष्ठ संबंध होते. त्यामधून तक्रारी झाल्या. पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली. या प्रकरणावरुन व्यक्तिगत हल्ले होतील याचा अंदाज असावा म्हणून त्यांनी हायकोर्टात अर्ज केला आणि आदेश मिळवला." "धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर आहे. या संदर्भातील निर्णय पक्ष म्हणून करावा लागले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासमोर हा विषय मांडणार आहे. माझं कर्तव्य आहे की त्यांनी सांगितलेली माहिती या नेत्यांपुढे मांडणं. त्यांची मतं जाणून घेत पुढची पावलं लवकरात लवकर उचलण्यासंदर्भात निर्णय घेणार आहोत. या प्रकरणी विलंब व्हावा असं वाटत नाही. कोर्टाचा निर्णय होईल, तपास होईल, पक्ष म्हणून, पक्षप्रमुख म्हणून तातडीने निर्णय घेऊ," असं शरद पवार म्हणाले.
Sharad Pawar | धनंजय मुंडेंवरील आरोपांचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून निर्णय घ्यावा लागेल : शरद पवार
धनंजय मुंडे यांनी स्वत: रेणू यांची बहीण करुणा यांच्याबरोबरच्या संबंधातून त्यांना दोन मुले झाल्याचा खुलासा केला आहे. यानंतर त्यांच्यावर भाजपकडून टीकेची झोड उठली आहे. सोबतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही- चंद्रकांत पाटलांची पोस्ट
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत म्हटलं आहे की, सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल तात्काळ राजीनामा द्यायला हवा. मुंडे यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही. भाजपच्या महिला शाखेच्या वतीनं एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून त्यामध्ये मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. आम्ही आता याविषयी आणखी जोरदार मागणी करणार आहोत. ज्या व्यक्तीवर असे आरोप होतात त्याला त्या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नसतो. मात्र गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करुन धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटत नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ! आमदारकी धोक्यात? कायदा काय सांगतो?
नैतिकता महत्वाची - देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमध्ये बोलताना म्हटलं होतं की, धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली दिली आहे. त्यांच्या पक्षानं तातडीनं दखल घ्यावी. नैतिकता महत्वाची आहे. चौकशी करून काय बाहेर येतं ते बघावं. आम्ही त्यानंतर पुढची मागणी करणार आहोत, असं ते म्हणाले.
निवडणूक आयोगाकडे तक्रार
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटलं होतं की, मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वत: कबूल केलं आहे की, त्यांनी दोन लग्न केली आहेत. अनेक मुलं आहेत. तसंच तिसऱ्या महिलेशीही त्यांचे संबंध आहेत. त्यांनी हे देखील सांगितलं आहे की, त्यांनी पत्नी आणि मुलांच्या नावे अनेक प्रॉपर्टी घेतल्या आहेत. निवडणूक प्रतिज्ञापत्रात हे काही दिसत नाही, म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे या सर्व गोष्टींचा तपास व्हायला हवा, अशी तक्रार केली आहे, असं सोमय्या यांनी म्हटलं.