Maharashtra Breaking News LIVE Updates: राज्यात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाच्या नव्या प्रकरणाचे रुग्ण वाढू लागल्यानं जगभरातून चिंता व्यक्त केली जात आहे. यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आलीय. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंग साठी पाठवण्यात आलेत. तसेच त्याला ओ मायक्रोनची लागण झाली आहे का? याचीही तपासणी केली जाणार असल्याचं सांगितलं जातंय.
पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 90 रुग्णांनी केली कोरोनावर मात
पुण्यात गेल्या 24 तासात 97 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 90 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. पुण्यात आतापर्यंत 496615 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात एकाही कोरनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला नाही. सध्या पुण्यात 852 सक्रिय रुग्ण आहेत. आज पुण्यात 3926 नागरिकांची स्वॅब तपासणी झाली आहे.
चर्चेला मला बोलवा, एसटी विलिनीकरण कसं करायचं ते मी सांगतो; प्रवीण दरेकरांचे आव्हान
एसटी संपाबाबत सरकारला मी आव्हान करतो, चर्चेला मला बोलवा विलनीकरण कसे करायचे ते मी तुम्हाला सांगतो असं विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.
परळी वैजनाथनंतर अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवी मंदिर देवस्थानला धमकी
चार दिवसांपूर्वी परळी वैजनाथ देवस्थानला 50 लाख रुपयांची मागणी करणारे पत्र मिळाले होते. असेच पत्र अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या नावाने पाठविण्यात आले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रावर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आला आहे.. योगेश्वरी देवस्थान कमिटी च्या नावाने आलेल्या पत्रामध्ये पन्नास लाख रुपये द्या. नाहीतर मंदिर उडवून देऊ अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे.
Nagpur Crime News : नागपूर पुन्हा एकदा हत्येच्या घटनेनं हादरलंय. नागपूरात 78 वर्षीय वृद्धेची घरात गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. देवकी बोबडे असं हत्या झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्या टीबी रुग्णालयाच्या सेवानिवृत्त डॉक्टर होत्या. धक्कादायक म्हणजे मारेकऱ्यांनी घरात घुसून वृद्ध देवकी बोबडे यांचे दोन्ही हात खुर्चीला बांधून आणि तोंडाला पट्टी बांधून धारदार शस्त्राने त्यांचा गळा चिरून हत्या केली. नंदनवन पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
राज्यात 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस
राज्यात पुन्हा पावसाच्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 30 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अरबी समुद्रात 30 नोव्हेंबर रोजी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पावसाची शक्यता आहे.
राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा 1 डिसेंबर पासून सुरू, शासनाचा निर्णय
शिक्षण विभागाकडून अखेर 1 डिसेंबर पासून राज्यातील पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्यात येणार, असा शासनानं निर्णय घेतलाय.
भाजप नेते विनोद तावडे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट
भाजप नेते विनोद तावडे यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतलीय. तावडे यांची नुकतीच राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून पदोन्नती झालीय.
6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करु नका, प्रशासनाचे अनुयायांना आवाहन
6 डिसेंबरला चैत्यभूमीवर गर्दी करु नका, प्रशासनाने अनुयायांना आवाहन केले आहे. ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महापरिनिर्वाण दिनाच्या नियोजनासंदर्भात बैठक घेतली होती. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही महापरिनिर्वाण दिनाला चैत्यभूमीवर येण्यास निर्बंध घातले जाऊ शकतात. महापालिकेकडून महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी शिवाजी पार्क येथे अनुयायांकरता व्यवस्था केली जाते मात्र,यंदा ती केली जाणार नाही. अनुयायांनी गेल्यावर्षीचे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळणे गरजेचे आहे.
अमरावतीत कारचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू तर चारजण जखमी
अमरावतीत बोलेरो कारचा भीषण अपघात झाला आहे . या अपघातात एकाचा मृत्यू आणि चार जखमी झाले आहेत. अमरावती ते दर्यापूर मार्गावरील म्हैसपूर फाट्याजवळ ही घटना घडली आहे. या धडकेत नागपूर येथील शिक्षिका भारती गजभिये यांचा मृत्यू झाला असून पत्रकार प्रेम गजभिये गंभीर जखमी आहेत.