(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Maharashtra Nagarpanchayat Election : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर आज मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही आज मतदान होत आहे. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी आज सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान होतंय. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान आज होतं आहे. तसेच, उद्या (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
105 नगरपंचायतीपैकी पालघर-तलासरी, विक्रमगड, मोखाडा, नाशिक- पेठ, सुरगाणा, नंदुरबार-धडगाव-वडफळ्या-रोषणमाळ, यवतमाळ-झरी-जाणणी, गडचिरोली-मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडले. उरलेल्या 95 नगरपंचायतीपैकी माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली होती. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी आज मतदान होणार आहे.
ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे 106 नगरपंचायतींमधील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव जागांसाठीची निवडणूक प्रक्रिया स्थगित करण्यात आल्या होत्या. त्यामुळे या जागा खुल्या गटात समजल्या जाणार आहेत. ओबीसी राजकीय आरक्षण रद्द झाल्यानंतर 27 टक्के जागा या खुल्या प्रवर्गात वर्ग करण्यात आल्या होत्या. 21 डिसेबंरला झालेल्या 11 नगरपंचायतीच्या निवडणुका आणि आज होणाऱ्या निवडणुका यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे, 19 जानेवारीला होणार आहे. मतदानाला सकाळी 7.30 वाजल्यापासून सुरु झालं असून आणि संध्याकाळी 5.30 पर्यंत मतदान असेल.
नाना पटोले यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, भाजप आक्रमक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणीची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. नाना पटोले यांच्याविरोधात भाजप पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे. नाना पटोलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या विधानाचा भाजप नेत्यांनी निषेध करत त्यांच्यावर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले होते नाना पटोले
भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी 'मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो' असे वक्तव्य केले होते. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.
मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट, तीन जवान शहीद
मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत. या स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
कला संचालनालयाकडून घेणाऱ्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या तारखा जाहीर
कला संचालनालयाकडून घेणाऱ्या एलिमेंटरी, इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. त्यानुसार 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी इंटरमिजिएट परीक्षा तर 15 आणि 16 फेब्रुवारी रोजी एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षा घेण्यात येणार आहे
डॉ. अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी निवड
डॉक्टर अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदी निवड झाली आहे. 4 फेब्रुवारीपासून पदभार स्वीकारणार आहे.
गोव्याहून हावडाकडे निघालेली अमरावती एक्सप्रेस रुळावरून घसरली
गोव्याहून हावडाच्या दिशेने निघालेली अमरावती एक्सप्रेस रुळावरून घसरल्याची घटना मंगळवारी सकाळी नऊ वाजता घडली. रेल्वेच्या लोको पायलटच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली.सुदैवाने रेल्वेतील सगळे प्रवासी आणि कर्मचारी यांना कोणतीही इजा झाली नाही. अमरावती एक्सप्रेस इंजिनची पुढील चाके रुळावरून घसरली. चाके रुळावरून घसरल्याचे लोको पायलटच्या ध्यानात येताच त्वरित त्याने रेल्वे थांबवली.त्यामुळे अनर्थ टळला.दूधसागर आणि करंजोल दरम्यान रेल्वे मार्गावर ही घटना घडली.ही रेल्वे सकाळी साडे सहा वाजता वास्कोहून हावडाला निघाली होती.
'नाना पटोलेने समोर यावं, त्याला डांबरी रस्त्यावरच तुडवून काढू', पिंपरीच्या महापौर माई ढोरेंची जीभ घसरली
नाना पटोले यांच्या मोदी बद्दलच्या व्हायरल व्हिडीओतील वक्तव्याचा पिंपरी चिंचवडच्या महापौर माई उर्फ उषा ढोरे यांनी समाचार घेतला आहे. 'पंतप्रधान पदाच्या व्यक्तीची नाना पटोलेला किंमत कळत नसेल तर प्रदेशाध्यक्ष करण्याच्या तो लायकीचा नाही. नाना पटोलेने फक्त समोर यावं, डांबरी रस्त्यावर तुडवून त्याला त्याची जागा दाखवू. यासाठी पुरुषांची देखील गरज नाही आम्ही महिलाच त्याला पुरेशा आहोत.' असं ढोरे म्हणाल्या.