Maharashtra Breaking News 4 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर महत्वाची सुनावणी
राज्यातील सत्तासंघर्षावर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली असताल त्यामध्ये उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद झाला. उद्धव ठाकरेंच्या वकिलांकडून वारंवार बंडखोरांकडे दुसऱ्या पक्षात विलीन होण्याशिवाय पर्याय नसल्याचा मुद्दा पुढे केला. तर शिंदे गटाने वारंवार आपण अद्यापही पक्षातच असून सदस्यत्व सोडलं नसल्याचा दावा केला. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने यावेळी शिंदे गटाचे वकील हरिश साळवे यांना लेखी युक्तिवाद नव्याने तयार करण्यास सांगत आज म्हणजेच गुरुवारी सुनावणी घेणार असल्याचं स्पष्ट केलं. शिंदे सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका आणि शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याबाबत विधानसभा उपाध्यक्षांनी दिलेल्या नोटिसीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज एकत्रित सुनावणी होणार होणार आहे. राज्यात सत्तासंघर्ष सुरु असताना सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं.
संजय राऊतांची कोठडी आज संपणार, आज पुन्हा कोर्टात सुनावणी
ईडीच्या अटकेत असलेल्या खासदार संजय राऊतांना 4 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली होती. ईडीने आठ दिवसांची कोठडी मागितली होती, पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलंय, आठ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय? असा सवाल उपस्थित केला. त्यावर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत त्यांना 4 ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली.
पत्रा चाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांचा संबंध असून प्रवीण राऊत यांच्या माध्यमातून संजय राऊत यांनी पैसा मिळवला. प्रवीण राऊत फक्त मोहरा होता, खरे सूत्रधार संजय राऊत हेच होते, आमच्याकडे याचे पुरावे आहेत असा दावा ईडीने केला आहे. तसेच राऊतांनी दोन साक्षीदारांना धमकावल्याचं ईडीच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितलं. संजय राऊत यांना जर बेल मिळाली तर ते पुन्हा धमकाविण्याचं किंवा त्यापुढे जाऊन कृत्य करु शकतात, तसेच राऊत यांचे परदेश दौरे बिझनेसमन आणि विविध लोकांकडून पुरस्कृत केले जातात, याचं नेमकं कारण काय? असा सवाल करत प्रवीण राऊत हे संजय राऊतांना दर महिन्याला दोन लाख देत होते, ते कशासाठी? असा सवालही ईडीने उपस्थित केला आहे.
छोटा शकीलचा साडू सलीम फ्रूटला एनआयएने केली अटक
डी गँगशी संबंध असल्याने सलीम फ्रूटला अटक करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी एनआयएने अनेकदा चौकशीसाठी बोलावले होते. एनआयएने काही महिन्यांपूर्वी डी कंपनीशी संबंध असल्याप्रकरणी आरिफ भाईजान आणि त्याचा भाऊ शब्बीर या दोघांना अटक केली होती.
जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, सुप्रीम कोर्टाच्या सुणावणीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्वल निकम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुणावणीबाबत ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. घटनात्मक पेचाबद्दल मुख्यमंत्री उज्वल निकम यांचे मार्गदर्शन घेणार आहेत. मुख्यमंत्री आजारी असल्यानं आज नंदनवन बंगल्यातच त्यांचा मुक्काम असणार आहे. आज आमदारांच्या गाठीभेटी आणि शासकीय बैठका केल्या होत्या.
Cabinet Expansion : उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, सूत्रांची माहिती
Maharashtra Political Crisis : उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
लोणार तालुक्यात मुसळधार पाऊस, नदीला पूर आल्याने सावरगाव तेली गावचा संपर्क तुटला
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात आज सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नदी नाल्यांना पूर आला आहे. सावरगाव तेली या गाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसाने नदीवरील पूल पाण्याखाली गेल्याने या गावाचा संपर्क गेल्या दोन तासांपासून तुटलेला आहे. यामुळे शेतात काम करणारे मजूर व शाळेतील विद्यार्थी पुलावर अडकून पडले होते. सावरगाव तेली येथील पूल लहान असल्याने अनेकदा हा पूल पाण्याखाली गेलेला आहे. अनेक वर्षांपासून नवीन पुलाची मागणी गावकरी करीत आहेत. मात्र अजूनपर्यंत पूल झालेला नाही.
मंत्रिमंडळ विस्तारासाठी मोर्चे काढावे लागतील : सतेज पाटील
कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून राज्याचा मंत्रिमंडळाचा विस्तार पुढे ढकलला जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जी खाती मागत आहेत ती भाजपाला द्यायची नाहीत. त्यामुळे काँग्रेस किंवा इतर पक्षातील आमदार फुटणार आहेत, असं सांगून एकनाथ शिंदे यांच्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केलाय. साताऱ्यात झालेल्या पत्रकार परिषादेत ते बोलत होते.
मंत्रिमंडळ आणण्यासाठी मोर्चे काढण्याची वेळ आली आहे. एकीकडे अतिवृष्टी झाली, काही ठिकाणी पाऊस नाही. अशा परिस्थितीत दोघांकडून सरकार चालवणे योग्य नाही. सध्या तारीख पे तारीख सुरू आहे. त्यात कोर्ट काय निर्णय देते आहे त्याची काळजी असावी. शिवाय कोणाला कोणती खाती द्यायची यावरून वाद असू शकतो. शिंदे गटात पहिल्यांदा आलेल्या 20 आमदारांना मंत्री पदे द्यायची की नंतर आलेल्या 20 जणांना यावर देखील वाद सुरू असू शकतो. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होत नसेल, असे सतेज पाटील म्हणाले.