(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News 19 April 2022 : नालासोपारात नवव्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Important days in 19th April : एप्रिल महिना सुरु झाला आहे. या दरम्यान, प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्व आहे. या दिनविशेषच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला इतिहासातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा देणार आहोत. एप्रिल महिन्यात सामाजिक, आर्थिक आणि दैनंदिन जीवनात त्या दिवसाचं महत्त्व नेमकं काय आहे हे या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात 19 एप्रिलचे दिनविशेष...
1882 : चार्ल्स डार्विन, जीवशास्त्रज्ञ यांचे निधन
हक्सचार्ल्स रॉबर्ट डार्विन हा जीवशास्त्रज्ञ होता. त्याला उत्क्रांतिवादाचा जनक समजले जाते. त्याने मांडलेल्या उत्क्रांतिवादाच्या सिद्धांताने जगातील जीवसृष्टीच्या उत्पत्ती आणि विकासाची कशी प्रगती होत गेली हे शास्त्रीय पद्धतीने उलगडून दाखवले. सन 1882 साली इंग्रजी निसर्गविज्ञानी, भूगर्भशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ तसेच, उत्क्रांती विज्ञानाचे जनक चार्ल्स डार्विन यांचे निधन झाले.
1892 : शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक यांचा जन्म
ताराबाई मोडक यांचा जन्म इंदूर येथे 19 एप्रिल 1892 रोजी झाला. त्या एक मराठीभाषक आणि 'भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ होत्या. त्यांना भारताच्या 'मॉन्टेसरी’म्हणतात. ताराबाईंना इ.स. 1962 साली ‘पद्मभूषण’हा प्रतिष्ठेचा नागरी सन्मान बहाल करण्यात आला.
1910 : क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचे निधन
अनंत लक्ष्मण कान्हेरे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक सशस्त्र क्रांतिकारक होते. ते स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'अभिनव भारत' या क्रांतिकारक संघटनेचे सदस्य होते. नाशिकचा कलेक्टर ए.एम.टी. जॅक्सन याची हत्या करणारे अनंत कान्हेरे हे खुदीराम बोस यांच्यानंतरचे सर्वांत तरुण वयाचे भारतीय क्रांतिकारक ठरले.
1957 : भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जन्म
मुकेश धीरूभाई अंबानी यांचा जन्म 19 एप्रिल 1957 रोजी झाला आहे. भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक, फॉच्र्युन ग्लोबल 500 कंपन्या आणि त्याच्या बाजार मूल्याद्वारे भारतातील सर्वात मूल्यवान कंपनी आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकानुसार, मुकेश अंबानी $97.4 अब्ज संपत्तीसह 11व्या स्थानावर आहेत.
1975 : आर्यभट्ट हा भारताचा पहिला उपग्रह रशियन अंतराळ केंद्रावरून प्रक्षेपित करण्यात आला.
आर्यभट्ट् हा भारताने विकसित केलेला पहिला उपग्रह आहे. प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे. हया उपग्रहाचे प्रक्षेपण रशिया मधिल कापुस्टीन यार ह्या अवकाश केंद्रावरून 19 एप्रिल 1975 साली कॉसमॉस-३एम हा उपग्रह वाहकाद्वारे करण्यात आले.
19 एप्रिल : अंगारक संकष्ट चतुर्थी
अंगारकी संकष्टी चतुर्थी ही सर्वात शुभ मानली जाते. अंगारकी संकष्टी चतुर्थी हे व्रत कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी साजरे केले जातो. संकष्ट चतुर्थी जी मंगळवारी येते त्याला 'अंगारक योग संकष्ट चतुर्थी' असे म्हणतात. अंगारकी संकष्टी चतुर्थी गणपतीला समर्पित आहे.
जागतिक यकृत दिन
यकृतसंबंधी आजारांची माहिती होण्यासाठी 19 एप्रिल हा जागतिक यकृत दिन म्हणून साजरा करण्यात येतो. मानवी शरीरात यकृत (लिव्हर) महत्त्वपूर्ण अवयव आहे.
नालासोपारात नवव्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू
नालासोपारात नवव्या मजल्यावरुन पडून एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नालासोपारातील आचोले रोड येथील ए वी क्रिस्टल या बांधकाम चालू इमारतीच्या नवव्या मजल्यावरुन पडून, सखाराम बिराजदार या 38 वर्षाच्या मजूराचा मृत्यू झाला आहे. घटना दुपारी साडे तीनची आहे. मयत सखाराम हा इमारतीच्या डकमध्ये प्लाय जोडण्याच काम करत होता. त्यावेळी तोल गेल्याने त्याचा पडून मृत्यू झाला आहे. त्याच्या पश्चात दोन मुले एक मुलगी आणि पत्नी असा परिवार आहे. इमारतीच्या मालकाने मजुरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना न केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, आसिफ शेख मागणी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मालेगांव शहर जिल्हाअध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांनी केली आहे. राज ठाकरे यांच्या पुण्यातील पत्रकार परिषदेचा अभ्यास करून गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. आसिफ शेख यांनी घेतली गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली. स्वतःच्या राजकीय फायदासाठी राज ठाकरे दोन समाजात तेढ निर्माण सलोख्याचे वातावरण दूषित करण्यासाठी कट रचत असल्याचा आरोप करत राज यांच्या विरोधात मालेगावमधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
उल्हासनगरात दोन गटात हाणामारी, हिललाईन पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल
प्रेयसी कुणाची यावरून उल्हासनगर शहरात भर रस्त्यात दोन गटात हाणामारी झाली आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात दोन्ही गटांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. या हाणामारीत तीन ते चार जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भानू कोरी या तरुणाचे एका तरुणीसोबत प्रेम संबंध होते. मात्र, काही दिवसांपासून ती त्याला सोडून शाकीब खान या तरुणाच्या प्रेमात पडली होती. याचा राग भानूला आल्याने शाकीबला फोन करून उल्हासनगरच्या नेताजी चौकात बोलवले, मात्र भानू सोबत आधीपासून त्याचे मित्र होते. याची कुणकुण शाकीबला लागली होती. म्हणून शाकिब देखील आपल्या तीन मित्रांसोबत तिथे आला. या वेळी गिर्लफ्रेंड कोणाची यावरून दोन्ही गट एकमेकांसमोर येताच तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
सांगली : भाजपच्या पोलखोल यात्रेवरुन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा भाजपला टोला
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, भाजपवाले आता तरी भानावर येऊन विरोधी पक्षाचं काम करतील, अशी अपेक्षा आहे. महाविकास आघाडी सरकार जेव्हापासून आलं तेव्हापासून भाजप पक्ष सतत हे सरकार पडावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
Nashik : सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनासाठी गेलेले दोन विद्यार्थी बुडाले
नाशिकच्या प्रसिद्ध सोमेश्वर धबधब्यावर दोन महाविद्यालयीन विद्यार्थी बुडाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीस आली. आर्टिलरी सेंटर या लष्करी परिसरात राहणारे चार मित्र सोमेश्वर धबधब्यावर पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आले होते, मात्र याचवेळी धर्मेंद्र मेहेर आणि आकाश पचोरी या दोघांनी पोहोण्यासाठी पाण्यात उडी मारताच पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले. 24 वर्षीय धर्मेंद्रला वाचविण्यासाठी 22 वर्षीय आकाश पाण्यात उतरला होता मात्र तो ही परतला नाही. स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून दोघांचा शोध सध्या घेतला जातोय. धबधबा खळाळून वाहत असल्याने शोध कार्यास अडचणी येत असून गंगापूर धरणातून होणारा विसर्गही काही काळ बंद करण्यात आलाय.