Maharashtra Breaking News 07 September 2022 : मुख्यमंत्र्यांच्या गणपती दर्शनामुळे पुण्यातील रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.
राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी
राज्यातील सत्तासंघर्ष प्रकरणी सुनावणी घेण्यात येणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची रचना जाहीर करण्यात आली आहे. न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच न्यायमूर्तींचे घटनापीठ महाराष्ट्राच्या प्रकरणाची सुनावणी करणार आहे. त्यामुळे उद्या, बुधवारी सकाळी साडे दहा वाजता या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार आहे. या प्रकरणी जवळपास 11 मुद्द्यांवर हे पाच न्यायाधीशांचे खंडपीठ निर्णय देणार आहे. आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल.
1. न्या. धनंजय चंद्रचूड
2. न्या.एम आर शहा
3. न्या. कृष्ण मुरारी
4. न्या.हिमाकोहली
5. न्या. पी नरसिंहा
आज निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीबाबत सुप्रीम कोर्टाची भूमिका ठरण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर हे घटनापीठ नियमित कधीपासून कामकाज करणार हे स्पष्ट होईल. मुख्य न्यायमूर्ती उदय लळीत यांनी पाच सदस्य खंडपीठाचे गठन केले आहे. हे पाच सदस्यीय खंडपीठ उद्या सकाळी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाच्या याचिकांवर सुनावणी करेल.
किरीट सोमय्या यांचा पुन्हा रत्नागिरी दौरा
भाजप नेते किरीट सोमय्या आज पुन्हा रत्नागिरी दौऱ्यावर जाणार आहेत. अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याच्या प्रक्रियेला गती देणं हे प्रमुख कारण यामागे आहे. दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी, दुपारी 1 वाजता पोलीस अधीक्षक, त्यानंतर जिपचे सीईओ यांची ते भेट घेणार आहेत.
ख्वाजा युनूस प्रकरणाशी संबंधित एका याचिकेवर सुनावणी
ख्वाजा युनूस प्रकरणातील आरोपी असलेल्या चार पोलिसांना दिलासा मिळणार का हे आज स्पष्ट होईल. या पोलिसांची नावं मागे घेण्यासाठी सरकारी वकिलांनी कोर्टात अर्ज केला आहे. त्यावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी होत आहे. साल 2002 च्या घाटकोपर ब्लास्टमधील संशयित आरोपी ख्वाजा युनूसच्या कोठडीतील मृत्यूनंतर त्याची आई आसिया बेगमने न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे.
Nagpur Heavy Rain : नागपुरात वीजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात
नागपूरः दिवसभराच्या दमट वातावरणानंतर नागपुरात सायंकाळी सहाच्या सुमारास वीजाच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली.
#Rain #NagpurRain #Lightning #Heavyrainfall
अमित ठाकरे यांनी घेतले दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन
Pune: मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी आरती करून गणरायाचे आशीर्वाद घेतले . ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
MAH - AAC - CET - 2022 प्रवेश परीक्षेच्या उत्तर पत्रिकांच्या मूल्यांकनात घोटाळ्याचा आरोप
MHA - AAC - CET - 2022 चा निकाल नुकताच जाहीर झाला . त्या निकालावर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेत, घोटाळा झाल्याचा आरोप परीक्षार्थी आणि त्यांचे पालकांनी केलेला आहे . लागलेल्या मिरीटनुसार मेरिटमध्ये आलेल्या प्रथम काही विद्यार्थ्यांच्यां गुणदांनामध्ये गैरप्रकार पाहायला मिळत आहे असे विद्यार्थी व पालकांचे म्हणणे आहे . याची चौकशी करून कारवाई करा, तसेच या परीक्षेचा पुन्हा मूल्यांकन करा अशी मागणी पालक व विद्यार्थी करत आहेत. यासंदर्भात कला विभाग आणि सीईटी परीक्षा केंद्राशी संपर्क साधला असता काहीही प्रतिक्रिया मिळाली नाही . मात्र या परीक्षेत घोटाळा झाला आहे असे म्हणणाऱ्या विद्यार्थी व पालकांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी यांनी.
अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार वर्षा निवासस्थानी दाखल
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले असले तरीदेखील राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलेय. महाविकास आघाडी सरकार पडल्यानंतर ही पार्थ पवार वर्षा निवासस्थानी गेल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Aurangabad : 'रक्षा स्थायी समिती का अध्ययन दौरा' असं गाडीवर स्टिकर लावून आयकर विभागाची छापेमारी
सुरुवातीला दुल्हन हम ले जायेंगे, त्यानंतर कृषी अभ्यास दौरा आणि आता 'रक्षा स्थायी समिती का अध्ययन दौरा' असं गाडीवर स्टिकर लावून आयकर विभागाने औरंगाबाद येथे चार ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. औरंगाबाद येथील धान्य व्यापाऱ्यावर ही धाड टाकण्यात आली आहे. शहरातील ज्योतीनगर भागात राहणाऱ्या व्यास नावाच्या धान्य व्यापाऱ्यांवर ही छापेमारी सुरू आहे. देशभरात या संबंधात छापेमारी सुरू आहे. सदरील व्यापाऱ्याकडे राजस्थानमध्ये शासकीय योजनेसाठी धान्य पुरवण्याचं कंत्राट असल्याची माहिती आहे. यातूनच ही छापेमारी सुरू आहे. सदरील व्यापाऱ्यांचे पुतणे हे औरंगाबादचे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत. त्यामुळे राजकीय अँगलनेदेखील या छापेमारीकडे पाहिले जात आहे.