Maharashtra Breaking News 06 July 2022 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उद्या शेगाव दौऱ्यावर
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...
कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पुढचे 4 दिवस रेड अलर्ट, अतिमुसळधार पावसाचा इशारा
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापुरात पुढचे 5 दिवस हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केलाय. मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, पुण्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य आणि उत्तर महाराष्ट्रातही मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे, पुढचे 5 दिवस राज्यात सर्वदूर पाऊस पडणार आहे. काल संध्याकाळपासून सिंधुदुर्गात पावसाचा जोर कमी झाला होता. चिपळूणमध्ये मात्र पावसाचा जोर वाढत आहे. वाशिष्ठी नदी इशारा पातळीवर वाहत आहे.
पावसाचा जोर असाच राहिल्यास आज पंचगंगा, कृष्णा नदी धोक्याची पातळी ओलांडणार
कोल्हापुरात गेले दोन दिवस पावसाचा जोर चांगलाच वाढला. आजही कोल्हापूरला रेड अलर्ट आहे. कोल्हापूर शहराबरोबरच शिरोळ, हातकणंगले करवीर तालुक्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास जनावरांसह स्थलांतरासाठी तयार राहा असं आवाहन प्रशासनानं नदी किनाऱ्यावरील नागरिकांना केलं आहे. जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सांगलीतही कृष्णा नदीच्या पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सतर्क झाला असून नदीकाठी काही बोटी तैनात करण्यात आल्या आहेत.
शिवसेनेचे 11 खासदार शिंदेंच्या संपर्कात?
राष्ट्रपती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या खासदारांचाही उद्धव ठाकरेंवर भाजप प्रणित उमेदवार द्रौपदी मुर्मूंना पाठिंबा देण्यासाठी दबाव वाढतोय. यात पहिलं पाऊल टाकलंय शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी. आता एकनाथ शिंदेच्या भूमिकेशी सहमत असलेले 11 खासदार शिंदेच्या संपर्कात आहेत अशी माहिती आहे. त्यामुळे, ठाकरे गटाला आणखी मोठा धक्का बसू शकतो.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठाकरे सरकारच्या कामाचा आढावा घेण्याची शक्यता
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मंत्रालयात येऊन कामकाजाचा आढावा बैठक घेण्याची शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे सरकाने घेतलेल्या निर्णयांच्या संदर्भात आढावा घेतला जाऊ शकतो अशी माहिती आहे.
शिंदे समर्थक आमदार मतदारसंघात परतणार... कुठे स्वागत, कुठे विरोध?
आमदार संतोष बांगर सकाळी 7 वाजता हिंगोलीत पोहचणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार त्यांना शिवसौनिकांच्या रोषाला सामोर जावं लागू शकतं. मुंबई- शिंदे समर्थक आमदार प्रकाश सुर्वे यांच्याकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ते अशोक वन परिसरात स्वागत रॅली काढली जाणार आहे. शेकडो कार्यकर्त्यांसह या शक्ती प्रदर्शनात सेना खासदार श्रीकांत शिंदे यांची हजेरी असेल. जळगाव- बंडखोर आमदार गुलाबराव पाटील आणि किशोर पाटील जळगावमध्ये पोहोचणार आहेत. मंत्रीपद मिळाल्यानंतरच जल्लोष केला जाणार असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. तर पाचोरा आमदार किशोर पाटील समर्थक मात्र आयत्या वेळी जल्लोष करण्याची शक्यता आहे.
धुळे- एकनाथ शिंदे यांच्या गटात गेलेल्या साक्री विधानसभा मतदार संघाच्या आमदार मंजुळा गावित आणि त्यांचे पती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित हे आज धुळ्यात येणार आहेत. त्यांचे स्वागत केले जाणार आहे.
पाऊले चालती पंढरीची वाट...
ज्ञानेश्वरांची पालखी आज माळिशरसहून निघून वेळापूरला पोहचेल. खुडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण पार पडेल. तुकोबांची पालखी आज अकलूजहून निघेल आणि बोरगावला मुक्कामी असेल. माळीनगर येथे उभं रिंगण होणार आहे.
यशोमती ठाकूर सुनील केदार नितीन राऊत या तिघांवर गुजरातमध्ये जबाबदारी
गुजरात विधानसभेसाठी प्रत्येक लोकसभा मतदारसंघाला एक एक मंत्री आणि काँग्रेसचा ज्येष्ठ नेता प्रभारी म्हणून नियुक्त करण्यात आला आहे
महाराष्ट्रातल्या यशोमती ठाकूर सुनील केदार नितीन राऊत या तिघांवर गुजरातमध्ये जबाबदारी
यशोमती ठाकूर यांच्याकडे बडोदा, सुनील केदार यांच्याकडे नवसारी तर नितीन राऊत यांच्याकडे वलसाड लोकसभा मतदारसंघातल्या विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी
मुंबईत शिवसेनेलाही संघटनात्मक पातळीवर खिंडार, पदाधिकाऱ्यांचे राजीनामास्त्र
मुंबईत शिवसेनेलाही संघटनात्मक पातळीवर खिंडार, पदाधिकाऱ्यांचे राजीनामास्त्र
मागाठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
२ शाखाप्रमुख, ३ शाखा संघटकांचा राजीनामा
प्रकाश पुजारी, कौस्तुभ मामुणकर ह्या शाखाप्रमुखांचा राजीनामा
महिला संघटक सुषमा गायकवाड, विद्या पोतदार, हेमलता नायडू यांचा राजीनामा
आमदार प्रकाश सुर्वे यांना पाठिंबा देत राजीनामास्त्र
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनपर डोंबिवलीत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव
एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल डोंबिवलीत शिंदे समर्थकानी जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला .गणेश मंदिर येथे मुख्यमंत्र्यांची पुढील कारकीर्द यशस्वी होण्यासाठी साकडे घालण्यात आले .ढोल ताशे , बँजो ,फटाक्यांची आतिषबाजीत डोंबिवली फडके रोड ते इंदिरा चौक दरम्यान भव्य रॅली काढण्यात आली होती. विशेष म्हणजे या रॅलीत डोंबिवलीतील शिवसेनेचे १२ ते १५ माजी नगरसेवक ,पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता .या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते .यावेळी नगरसेवक पदाधिकऱ्यांनी ढोल ताशा बँजो च्या ठेक्यावर डान्स करत आनंद व्यक्त केला .या रॅली च्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे पाहायला मिळालं .जोरदार पहिल्यांदाच ठाणे जिल्ह्याला मुख्यमंत्री पद लाभले असून एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी बहुमताने निवड झाल्याबद्दल डोंबिवलीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला असून डोंबिवली मधील शिवसैनिक आम्ही एकनाथ शिंदे सोबत असल्याचे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पालघर - शासकीय आश्रमशाळा साखरे येथे 12 वीत शिकणाऱ्या विध्यार्थीनीची आत्महत्या
पालघर : आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळांमध्ये सातत्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत असल्याचं प्रकार पुढे येत असून विक्रमगड तालुक्यातील आश्रमशाळा साखरे येथील 12 वीत शिकणाऱ्या विध्यार्थीनीने आज दुपारी 12 ते 3 वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या बाबत विक्रमगड पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु आहे. शासकीय आश्रमशाळा साखरे येथे खुडेद (कुडाचा पाडा) येथील इयत्ता 12 वी मध्ये शिकणाऱ्या विध्यार्थीनीने आश्रमशाळेतील वसतिगृहात आज 12 ते 3 च्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी शेगाव दौऱ्यावर
राज्यपाल भगतसिंह कोशारी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उद्या सायंकाळी 4.00 वाजता शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिरात दर्शनासाठी येणार आहेत.