मंत्रालयीन अधिकाऱ्यांकडून पंढरपूर विकास आराखड्याची पाहणी, नागरिकांचे समाधान झाल्यास मंदिर परिसरात घेणार मोकळा श्वास
Pandharpur News : पंढरपूर विकास आराखड्यांतर्गत वाराणसी व उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्यात येणार आहे. याबाबत स्थानिकांसह महाराज मंडळी यांना माहिती देण्यासाठी संत तुकाराम भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते
पंढरपूर : पंढरपूर कॉरिडॉर अंतर्गत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर (Pandharpur Vitthal Temple) परिसरात 200 फुटापर्यंत रुंदीकरण करण्याचा प्रस्ताव आज सामान्य प्रशासनच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीमध्ये संत तुकाराम भवन येथे सादर करण्यात आला. यास नागरिक आणि व्यापाऱ्यांचे समाधान झाल्यास मंदिर परिसर मोकळा श्वास घेणार आहे. आज सुजाता सौनिक यांनी अधिकाऱ्यांच्या सोबत मंदिर परिसर , चंद्रभागा वाळवंट , घाट आणि इतर आराखड्यातील ठिकाणांची पाहणी केली . महाद्वार घाटावरील श्रीमंत अहिल्यादेवी होळकर आणि शिंदे सरकार वाद्याचीही पाहणी केली .
दरम्यान यावेळी उपस्थित महाराज मंडळी, स्थानिक नागरिक, व्यापाऱ्यांनी यास कडाडून विरोध दर्शविला. याची दखल घेऊन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सदर आराखडा चार दिवस नागरिकांना खुला करण्यात येणार असून यावर हरकती सूचना मांडाव्यात असे आवाहन केले आहे . पंढरपूर विकास आराखड्यांतर्गत वाराणसी व उज्जैनच्या धर्तीवर कॉरिडॉर करण्यात येणार आहे. याबाबत स्थानिकांसह महाराज मंडळी यांना माहिती देण्यासाठी संत तुकाराम भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेप्रांताधिकारी गजानन गुरव आदी उपस्थित होते. मंदिराच्या बाजूने मोठे रुंदीकरण होणार असल्याची माहिती देताच उपस्थित नागरिक व्यापाऱ्यांनी बैठकीत मोठा गोंधळ सुरू केला. यावेळी नागरिकांनी आराखड्याविषयी सविस्तर माहितीच नसल्याचा मुद्दा मांडला.
दरम्यान बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये सुजाता सैनिक यांनी, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महाद्वार घाट असा कॉरिडॉर करण्याचा प्रस्ताव असल्याचे सांगितले. यासाठी 72 हजार वर्ग मीटर किंवा 40 हजार वर्ग मीटर अशी जमीन संपादित करण्याचा प्रस्ताव आहे. श्री विठ्ठल मंदिराच्या डाव्या व उजव्या बाजूस साठ मीटर अर्थात 200 फूट भूसंपादनाचा देखील प्रस्ताव असल्याची माहिती दिली. मात्र प्रथम श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील सर्व महत्त्वाची कामे पूर्ण केल्यानंतर बाहेरील विकासाचा विचार करण्यात येईल असेही सौनिक यांनी सांगितले आहे . यामध्ये विस्थापित होणाऱ्यांचे समाधान होईपर्यंत आराखडा राबविला जाणार नसल्याचेही आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.
इतर महत्त्वाच्या बातम्या :