राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेकांना आस्मान दाखवणारे महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचं निधन
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सामन्यात अनेकांना आस्मान दाखवणारे महाराष्ट्र केसरी आप्पालाल शेख यांचं आज सोलापूर येथील सहकारी रुग्णालयात निधन झालं आहे.
सोलापूर : सोलापुरातील प्रसिद्ध पैलवान अप्पालाल शेख यांचं आज (गुरुवारी 26 ऑगस्ट) दीर्घ आजाराने निधन झालं आहे, ते 56 वर्षांचे होते. 1991 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत अप्पालाल यांना सुवर्ण पदक, तर 92 साली महाराष्ट्र केसरीचा किताब त्यांनी मिळवला होता. जवळपास वर्षभरापूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या, तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोलापुरातील एका सहकारी रुग्णालयात काही वेळापूर्वी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असल्याची कुटुंबातील सदस्यांनी माहिती दिली. अप्पालाल यांच्या पश्चात 3 मुलं आणि मुलगी असा परिवार आहे. आज रात्री त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
अखेरच्या काळात मदतीसाठी याचना..
पैलवान जेव्हा कुस्तीच्या फडात असतो तेव्हा अनेक संस्था, संघटना, शासन त्यांच्या मदतीसाठी हजर असतात. त्यांच्या खुराकपासून सगळ्या गोष्टींच्या खर्चासाठी दत्तक घेतलं जातं. मात्र, जेव्हा हाच पैलवान कुस्तीच्या आखाड्यातून बाहेर पडतो तेव्हा मात्र तो एकाकी पडतो. अशीच काहीशी अवस्था राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये कुस्तीत सुवर्णपदक मिळवून देणारे, 1992 साली महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवणारे, ज्यांचा सन्मान शासनाने शिवछत्रपती पुरस्कार देऊन केला त्या आप्पालाल शेख यांची झाली होती. भल्या भल्या पैलवानांना आस्मान दाखवणाऱ्या आप्पालाल शेख यांना शेवटच्या दिवसांत जमिनीवर पाठ सुद्धा टेकवता येत नव्हती.
पैलवान आप्पालाल शेख हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील रहिवासी होते. त्यांचे बंधू इस्माईल शेख हे देखील पैलवान होते. इस्माईल यांनी कुस्तीच्या सरावासाठी कोल्हापूर गाठलं. त्यांच्या खाण्यापिण्याची सोय व्हावी म्हणून आप्पालाल देखील कोल्हापूरला गेले. तिथे त्यांना देखील कुस्तीची आवड निर्माण झाली. 1980 साली आप्पालाल यांचे बंधू इ्स्माईल यांनी महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळवला. भावाचा वारसा पुढे नेत पुढे 1992 साली आप्पालाल देखील महाराष्ट्र केसरी झाले. त्याआधी अनेक छोट्या मोठ्या कुस्त्या आप्पालाल यांनी लढल्या. बल्गेरिया आणि इराण येथे झालेल्या विश्वचषक कुस्ती स्पर्धेसाठी देखील आप्पालाल यांची निवड झाली. त्यात त्यांना यश आले नाही. मात्र, 1991 साली न्युझिलंड येथे झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत आप्पालाल यांनी भारतासाठी सुवर्ण पदक देखील पटकावलं. आप्पालाल यांचे पुतण्या मुन्नालाल शेख यांनी देखील 2002 साली महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. एकाच परिवारात तीन-तीन महाराष्ट्र केसरी आहेत.
आप्पालाल जेव्हा लंगोट बांधून हा लाल मातीत उतरला की समोरच्या पहिलवानांची मनगट आवळली जायची. हाबुक ठोकून कुस्तीला सुरुवात झाली आहे की समोरच्याची पाठ जमिनीला लावल्याशिवाय हा गडी कधीच मागे हटला नाही. आता मात्र त्याच जिगरबाज पहिलवानाला स्वतःची पाठ सुद्धा जमिनीवर नीट टेकता येत नव्हती. कोल्हापुरात असताना व्यायाम करताना एका गाडीने आप्पालाल यांना धडक दिली. ज्यात त्यांना गंभीर इजा झाली. तेव्हापासून काही ना काही आजारपण सुरु होतं. जवळपास 7 महिन्यांपूर्वी आप्पालाल शेख यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, उपचार करण्यासाठी पैसे नसल्यामुळे पुन्हा उभारायचं कसं असा प्रश्न या समोर उभा होता.
शासनाकडून महिन्याला 6 हजार रुपये मानधान मिळतं होतं. मात्र, ते ही सहा महिन्याला एकदाच. अपुरे मानधन आणि शेतीवर निर्भर असल्याने आप्पालाल यांना उपचाराचा खर्च परवडेनासा झाला होता. ज्यांनी कुस्तीसाठी सर्व काही लावलं आज त्यांची तीनही पोरं कुस्तीच्या फडात आपलं नशीब आजमावत आहेत. वडिलांचा ऑलम्पिक पदक मिळवण्याचा अपुरं राहिलेलं स्वप्न पुर्ण करण्याची इच्छा असल्याची प्रतिक्रिया आप्पालाल यांचा मुलगा गौसपाक यांने दिली. गौसपाक सोबत अशपाक आणि अस्लम हे दोघे कुस्तीचा सराव करतात. गावात तालमीची सोय नाहीये. त्यामुळे दुसऱ्यांच्या शिवारात माती टाकून आखाडा तयार केलंय. अशपाक आणि अस्लम हे दोघेही वयाने आणि वजनाने लहान आहेत. त्यामुळे गौसपाकला सराव करण्यासाठी त्याच्या ताकदीचा गावात दुसरा मल्ल ही नाहीये. गाव सोडून कोल्हापुरला जायचं म्हटलं तर वडीलांचा उपचार, सरावासाठी लागणारा खर्च हाच प्रश्न त्यात्यासमोरही होता. आप्पालाल यांनी आज अखेरचा श्वास घेतला.