तीन जिवलग मित्रांसह नऊ शिक्षकांचा कोरोनाने मृत्यू, जळगावातील चोपडा तालुक्यात खळबळ
Maharashtra Jalgaon Corona Update : कोरोनामुळे तीन जिवलग मित्रांचा चार ते पाच दिवसाच्या अंतराने मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
जळगाव : कोरोनामुळे तीन जिवलग मित्रांचा चार ते पाच दिवसाच्या अंतराने मृत्यू झाल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत मयत पावलेल्यांमध्ये दोन शिक्षक असल्याने शिक्षण क्षेत्रात ही चर्चेचा विषय बनला आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून चोपडा शहर आणि तालुक्यात कोरोनाने कहर माजवला असल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत आणि घडत आहेत.
त्यातच शहरातील धनवाडी रस्त्यालगत असलेल्या एका कॉलनीमधील तीन जिवलग मित्रांचा चार ते पाच दिवसांच्या अंतराने कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या तीन जिवलग मित्रांमध्ये दोन जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेत शिक्षक तर त्याच कॉलनीतील खाजगी वाहन चालक मित्राचा समावेश आहे. या तिघांसह नऊ शिक्षक मरण पावल्याने आणि दोनशे शिक्षकांना लागण झाल्यानं सर्वत्र चिंतेच वातवरण पसरलं आहे
सर्वप्रथम वाळकी तालुका चोपडा येथील रहिवासी आणि चुंचाळे तालुका चोपडा येथील जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असलेले त्रिशूल सदाशिव पाटील हे बाधित झाले. त्यांना उपचारार्थ जळगाव येथे जिवलग मित्र असलेले व त्याच कॉलनीमध्ये राहत असलेले खाजगी वाहन चालक प्रशांत गुरव (वय 39) आणि दुसरे मित्र व प्राथमिक शाळेतील शिक्षक दीपक रामदास वराडे हे वाहनात घेऊन गेले. त्यानंतर या दोघांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
उपचार घेत असताना 22 मार्च रोजी प्रशांत गुरव (वय 39) यांचा कोरोनाने मृत्यू झाला तर त्यानंतर तीन दिवसानंतर 25 मार्च रोजी प्राथमिक शिक्षक त्रिशूल सदाशिव पाटील (वय 38) यांचा मृत्यू झाला आणि 1 एप्रिल रोजी अनवर्दे बुद्रुक येथील जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असलेले दीपक रामदास वराडे (वय 33, मूळ रहिवासी हिरापूर तालुका चाळीसगाव) यांचा नाशिक येथे उपचार घेत असताना कोरोनामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे. जिवलग मित्रांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने शिक्षकांसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
गेल्या वर्षी प्रशांत गुरव यांच्या प्राथमिक शिक्षिका असलेल्या पत्नीचाही दुर्धर आजाराने मृत्यू झाला होता. त्यानंतर मागील महिन्यात प्रशांत गुरव यांच्या आईचे ही कोरोनामुळे निधन झाले असल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे प्रशांत गुरव यांना असलेल्या लहान बालकांचे छत्र हरपले आहे. या तीन जिवलग मित्रांचा कोरोनाने अंत केल्याने तालुक्यात सर्वत्र शोककळा पसरली आहे. 1 एप्रिल रोजी दीपक वराडे यांच्या कोरोनामुळे झालेल्या निधनाने तर शैक्षणिक क्षेत्र हादरले आहे.
गेल्या महिना भरात नऊ शिक्षकांचा चोपडा तालुक्यात कोरोनामुळे मृत्यू तर दोनशे जणांना बाधा झाल्याने अनेक शिक्षक आता कोणत्याही कारणांसाठी शाळेत जाण्यास कचरू लागले आहेत त्यामुळे प्रशासनाने यापुढे शिक्षकांना दिलासा देण्यासाठी घरूनच काम करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शिक्षक संघाने केली आहे.