Maharashtra HSC Result 2021 : बारावीचा निकाल कधी लागणार? वाचा ही बातमी
Maharashtra HSC Result 2021 Date Time : दहावीचा निकाल मागील आठवड्यात लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे.
Maharashtra HSC Result 2021 Date Time : दहावीचा निकाल मागील आठवड्यात लागल्यानंतर आता बारावीचा निकाल कधी लागणार याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागून आहे. यासंदर्भात महत्वाची माहिती हाती आली असून 23 जुलैपर्यंत 12 वीचे निकाल बोर्डाकडे पाठवा अशा सूचना सर्व महाविद्यालयांना बोर्डाकडून देण्यात आल्या आहेत. 23 च्या मध्यरात्रीपर्यंत निकाल सबमिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. महाविद्यालयांनी निकाल वेळेत सबमिट केल्यास महिन्याच्या शेवटी 12 वीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बारावी परीक्षा रद्द करुन दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण एकत्र करुन अंतर्गत मूल्यपामनद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निकाल तयार करण्याचे काम सुरू असताना मागील तीन ते चार दिवसापासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे निकालाच्या कामात अडचणी येत असून त्यासाठी आणखी चार-पाच दिवस वाढवून द्यावेत अशी मागणी शिक्षकांच्या वतीने करण्यात आली आहे.
सततच्या पडणाऱ्या पावसामुळे शिक्षकांना कॉलेजमध्ये येऊन बारावीच्या निकालाचे काम पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय, बारावीच्या शिक्षकांना 23 जुलैपर्यंत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत दिलेली आहे. परंतु हा कालावधी अपुरा असल्यामुळे यामध्ये चार ते पाच दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांकडून करण्यात येत आहे.
महाराष्ट्र शासनाने बारावीच्या शिक्षकांना मूल्यमापन व गुणतक्ते वर्ग शिक्षकाकडे सादर करण्यासाठी सात दिवस तर वर्ग शिक्षकांना परीक्षण व नियमन करण्यासाठी नऊ दिवस दिले होते. त्याची मुदत काल संपली असून अद्याप काही ठिकाणी हे काम संपलेले नाही. मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्यासाठी केवळ पाच दिवस दिलेले असून त्याची मुदत परवा 23 जुलै रोजी संपत आहे. मंडळाची संगणकीय प्रणाली त्यानंतर बंद होणार असल्याचे कळवण्यात आले आहे. संगणकीय प्रणाली मध्ये गुण भरण्याचे काम खूप कमी प्रमाणात झाले असून ते 21 जुलैपर्यंत पूर्ण होणार नाही.
काय म्हणाले शिक्षक
बारावीचे शिक्षक अत्यंत परिश्रमपूर्वक हे काम करीत आहेत. रात्रंदिवस एक करुन , कॉलेजमध्ये मुक्काम करुन निकाल तयार केले जातायेत. पण आता मुसळधार पावसामुळे इंटरनेट, वीज खंडित होत आहे. वाहतुकीची साधने नसल्यामुळे, वाहतुकीची कोंडी व वाहतूक अत्यंत मंदगतीने चालत असल्याने शिक्षक शाळा महाविद्यालयात पोचू शकत नाहीत, अत्यंत उशिराने पोचत आहेत. त्यामुळे शासनाने दिलेला कालावधी अत्यंत अपुरा पडत असून या कालावधीमध्ये शिक्षकांना मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये गुण भरणे शिक्षकांना शक्य होणारे नाही, असे मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सरचिटणीस मुकुंद आंधळकर यांनी सांगितले होते. तर 'बारावीच्या शिक्षकांना मुळातच कमी कालावधी दिलेला होता तरी बारावीचे शिक्षक अत्यंत मेहनतीने हे काम करीत होते परंतु आता मागील तीन दिवसात हे काम अत्यंत संथ झाले आहे, त्यामुळे शासनाने यासाठी किमान चार दिवसाची मुदत वाढवून देणे गरजेचे आहे व गुण भरण्यासाठी मंडळाची संगणकीय प्रणाली 23 जुलै नंतरही उपलब्ध करून देणे आवश्यक आहे' असं एसएनडीटी महाविद्यालयाचे शिक्षक शरद गिरमकर यांनी सांगितले होते.