एक्स्प्लोर
Advertisement
ऑल द बेस्ट....बारावी परीक्षेला आजपासून सुरुवात!
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा आजपासून सुरु होत आहे. राज्यभरात एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मंडळाने हेल्पलाइन क्रमांकही जारी केले आहेत. शिवाय दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मुंबई : राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतली जाणारी बारावीची परीक्षा आजपासून (18 फेब्रुवारी) सुरु होत आहे. राज्यातील एकूण 3036 परीक्षा केंद्रांवर 18 फेब्रुवारी ते 18 मार्च असा एक महिना बारावीची परीक्षा होणार आहे. राज्यभरातून 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचे 5 लाख 85 हजार 736 विद्यार्थी, कला शाखेचे 4 लाख 75 हजार 784 विद्यार्थी तर व्यावसायिक अभ्यासक्रमचे 57 हजार 373 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
यावर्षीच्या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा आराखडा बदललेला आहे. विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी मंडळाने हेल्पलाईन क्रमांकही जारी केले आहेत. शिवाय दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक विभागीय मंडळामध्ये प्रत्येकी एक याप्रमाणे जिल्हानिहाय समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
राज्यात कॉपीमुक्त परीक्षा व्हावी यासाठी 273 भरारी पथकं तयार करण्यात आली आहेत. परीक्षा काळात गैरप्रकार टाळण्यासाठी ही भरारी पथकं काम करणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात समित्या नेमण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षेला अर्धा तास आधी विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणं गरजेचे आहे. त्यामुळे सकाळच्या सत्रात सकाळी साडे दहाच्या आत आणि दुपारच्या सत्रात दुपारी अडीचच्या आत विद्यार्थ्यांनी केंद्रावर उपस्थित राहणे गरजेचे आहे.
शिवाय परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांना मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांच्या परीक्षांसाठी कॅल्क्युलेटर नेण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र विद्यार्थ्यांना मोबाईलमधील किंवा अन्य कोणत्याही इलेक्ट्रॉनिक्स साधनांमधील कॅल्क्युलेटर वापरता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्यासाठी बारावी परीक्षेच्या काही महत्त्वाच्या पेपरमध्ये एक दिवसाची सुट्टी देण्यात आली आहे.
माहिती तंत्रज्ञानची परीक्षा ऑनलाईन
माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. त्यासाठी 1 लाख 33 हजार 738 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. 1 हजार 669 केंद्रांवर ही परीक्षा होईल. सामान्यज्ञान या विषयाची परीक्षाही ऑनलाईनच होणार असून, 42 केंद्रांवर होणाऱ्या या परीक्षेसाठी 3 हजार 466 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
हेल्पलाईन क्रमांक
पुणे - 7038752972
नागपूर - (0712) 2565403/2553401
औरंगाबाद - (0240) 2334228/2334284/2331116
मुंबई - (022) 27881075/27893756
कोल्हापूर - (0231) 2696101/2696102/2696103
अमरावती - (0721) 2661608
नाशिक - (0253) 2592141/2592143
लातूर - (02382) 251733
कोकण - (02352) 228480
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
Advertisement