Maharashtra Gram Panchayat Elections | रत्नागिरीतील बिनविरोध ग्रामपंचायतींमुळे 47 लाखांचा खर्च वाचला!
Maha Gram Panchayat Election : रत्नागिरी जिल्ह्यातील 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. या बिनविरोध ग्रामपंचायतींमुळे सरकारचा 47 लाख 60 हजार रुपयांचा खर्च वाचला आहे.
रत्नागिरी : ग्रामीण भागांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीतील वाद टाळण्यासाठी युवावर्गाने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ आणि युवक यांच्यात गाव बैठकांमधून ताळमेळ घडून आणल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतीमधील तब्बल 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. एका ग्रामपंचायतीला निवडणुकीसाठी 40 हजार रुपये खर्च येत असून बिनविरोध ग्रामपंचायतींमुळे सरकारचे 47 लाख 60 हजार रुपये वाचले आहेत.
कोरोनामुळे रखडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका महिनाभरापूर्वी जाहीर झाल्या. अद्याप कोरोनाचे सावट असले तरी ग्रामीण भागातील राजकीय पदाधिकारी पक्षाच्या कामाला लागले होते. कोरोनाच्या कालावधीत ग्रामीण भागात युवा वर्ग आणि ज्येष्ठांमध्ये चांगला समन्वय निर्माण झाला आहे. गेल्या सहा ते सात महिन्यात अनेक समस्यांवर तोडगा निघाला आहे. त्यामुळे निवडणुका जाहीर झाल्यावर युवा वर्गाचा कल ग्रामपंचायतीत काम करण्यासाठी वाढला आहे. अगदी ज्येष्ठांनीही त्यांना मार्गदर्शन करत सहकार्याचा हात दिला. त्यामुळे जिल्हाभरात तब्बल 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
1818 सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. आता 360 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. यातील काही ग्रामपंचायती लक्षवेधी ठरल्या आहेत. निवडणुकीमध्ये शासकीय खर्चही मोठ्या प्रमाणात होत असतो. यामध्ये मतदान केंद्रांवर कर्मचाऱ्यांची नियुक्ती; वाहतूक, मतदान पेट्यांची ने-आण, भोजन भत्ता, केंद्रावरील स्टेशनरी यासाठी एका ग्रामपंचायतीला सुमारे 40 हजार रुपयांचा खर्च प्रशासनाला करावा लागतो. 119 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यामुळे सुमारे ४७ लाख 60 हजार एवढा निवडणूक खर्च वाचला आहे.
यापूर्वी बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीला 25 लाखांचे पारितोषिक प्रशासनाकडून दिले जात होते. कोरोनामध्ये मोठ्या प्रमाणात वैद्यकीय खर्च वाढल्याने बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायतींना 25 लाखांचे पारितोषिक मिळण्याबाबत कोणताही शासन आदेश अद्याप आलेला नाही. मात्र अनेक गावांनी घालून दिलेला आदर्श इतर ग्रामपंचायतींना घेण्यासारखा आहे.