Gram Panchayat Election : गावगाड्यात लोकशाहीच्या उत्सवाची लगबग, आज मतदान, प्रशासन सज्ज
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. आज, 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे.
Maharashtra Gram Panchayat Elections 2021 : राज्यातील जनतेचे लक्ष लागून असलेल्या 14 हजार गावांमध्ये राजकीय धुरळा उडणार आहे. आज शुक्रवार, 15 जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे. मतदान प्रक्रियेसाठी गुरुवारी दुपारी प्रत्येक तहसील कार्यालयाच्या वतीने मतदान केंद्रांवर ईव्हीएम (EVM) मशिन्स तसेच मतदान प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सामग्री रवाना करण्यात आली. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल प्रशासनासह शिक्षकांचा समावेश आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीनंतरच सरपंच सोडत जाहीर होणार, 8 जिल्ह्यांतील आरक्षण सोडतही रद्द
राज्यात 34 जिल्ह्यातील 14, 234 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडणार आहे. यातील काही गावांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. परंतु, कोविड-19 ची परिस्थिती उद्भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी ही निवडणूक घेण्यात येत आहे.
अशा असणार वेळा
आता मतदान 15 जानेवारी 2021 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. तर मतमोजणी 18 जानेवारी 2021 रोजी होईल. गडचिरोली जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्यातील चार तालुके वगळता सर्व ठिकाणी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. गडचिरोली आणि गोंदियातील चार तालुक्यांमध्ये दुपारी 3.00 पर्यंत मतदानाची वेळ असेल.
कोरोनाबाधित रुग्णांना मतदानाची विशेष सुविधा
कोरोनाबाधित आणि विलगीकरण कक्षातील व्यक्ती; तसेच दोनदा तपासणीनंतरही शरीराचे तापमान विहित निकषांपेक्षा जास्त असलेल्या मतदारांना मतदानाची वेळ संपण्याच्या अर्धातास आधी प्रतिबंधात्मक उपायांचे काटेकोर पालन करून मतदान करता येईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली होती.
कोल्हापुरात अंधश्रद्धेच्या नावावर लोकशाहीचा बाजार, शपथा घेऊन मतदान करण्यास दबाव
मतदानाच्या एक दिवस आधी मतदान केंद्राची जागा व साहित्य सॅनिटाईज केले जाईल. प्रत्येक मतदान केंद्राच्या प्रवेशाच्या ठिकाणी थर्मल स्कॅनिंगची व्यवस्था करण्यात येईल. एखाद्या मतदाराच्या शरीराचे तापमान विहित निकषापेक्षा जास्त असल्यास पुन्हा दुसऱ्यांदा तापमान घेतले जाईल. ते कायम असल्याचे आढळल्यास मतदारास टोकन दिले जाईल आणि त्यास मतदान संपण्याच्या अर्धा तास आधी बोलवण्यात येईल. सामाजिक अंतर राखण्याच्या दृष्टीने देखील दक्षता घेण्यात येईल. मतदाराची ओळख पटण्यासाठी मतदारांना आवश्यकतेनुसार फेसमास्क काढावा लागेल. यासह विविध मार्गदर्शक सूचनादेखील आधीच देण्यात आल्या आहेत, असेही मदान यांनी सांगितले होते.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या
ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362.