Grampanchayat Election: कोल्हापुरात अंधश्रद्धेच्या नावावर लोकशाहीचा बाजार, शपथा घेऊन मतदान करण्यास दबाव
राधानगरी तालुक्यातील एका मंदिरात गावकऱ्यांना नेलं गेलं आणि शपथा घेण्यास भाग पाडल्य़ाचं गावातील एकानं समोर आणलं आहे.
![Grampanchayat Election: कोल्हापुरात अंधश्रद्धेच्या नावावर लोकशाहीचा बाजार, शपथा घेऊन मतदान करण्यास दबाव Grampanchayat Election, take an oath to vote for someone in Kolhapur Grampanchayat Election: कोल्हापुरात अंधश्रद्धेच्या नावावर लोकशाहीचा बाजार, शपथा घेऊन मतदान करण्यास दबाव](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/06/04215152/voting.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
कोल्हापूर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुरळा सुरु झाला आहे. अवघ्या काही तासांवर मतदान येऊन ठेपलं आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातील अशी एक ग्रामपंचायत आहे की जिथं शपथेशिवाय काही चालत नाही. एका पॅनेलने शपथ दिल्यानंतर दुसऱ्य़ाने गावकऱ्यांची शपथेतून मुक्तता केलीय. कोल्हापूर जिल्ह्याच्या कागलमधल्या साके गावात हा अनोखा प्रकार घडला आहे.
साधारण चार हजार मतदान असलेल्या गावात चार पॅनेल तयार झाली आहेच. गाव मोठं असलं तरी अंधश्रद्धा ठासून भरली आहे. कारण तू मतदान कुणाला करणार यावर शपथा आणि भंडारा उचलणे असे प्रकार गावात घडलेत. राधानगरी तालुक्यातील एका मंदिरात गावकऱ्यांना नेलं गेलं आणि शपथा घेण्यास भाग पाडल्य़ाचं गावातील एकानं समोर आणलं. त्यांनी देखील शपथेतून गावकऱ्यांची सुटका व्हावी म्हणून राधानगरी तालुक्य़ातील त्याच देवीकडं कौल लावला.
बरं इतकं झाल्यावर गप्प बसतील असं वाटलं मात्र त्यानंतर गावात एकाने बोर्डच लावला आणि कामं केलीत तर शपथ कशाला? शपतीला मत नाही. मताला शपथ नाही. एकानी तर याचं समर्थनच करुन टाकलं. त्याने थेट राजभवन, आमदार, खासदार, मंत्री यांच्या शपथीचं उदाहरण दिलं.
रेणुका देवीच्या परडीतून पैसे वाटणाऱ्यांना देवी अद्दल घडवेल. मतदारांनी अशा प्रकाराला बळी न पडता भयमुक्तपणे मतदान करण्याचे आव्हान केले जात आहे. गावातील दोन प्रमुख गटात जे नाहीत त्यांनी दोन अपक्ष पॅनेल उभा केलीत. त्यामुळे चार पॅनेल आणि त्यात शपथा घेण्याचे प्रकार यामुळे साके गाव चांगलच चर्चेत आलं.
ग्रामीण भागात सर्रासपणे शपथ घेण्यास भाग पाडलं जातं. पण हे थांबण्यासाठी कुणी प्रयत्न करताना दिसत नाही.देव देवतांना गावच्या निवडणुकीत ओढलं जात आहे. शपथा-भंडारा उलचण्यास भाग पाडलं जातंय. मात्र लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी शपथ घेतल्याचं आतापर्यंत समोर आलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)