Ladki Bahin Yojana : महायुतीच्या यशाचं सर्वात मोठं सीक्रेट, लाडकी बहीण योजनेने मिळवून दिलं रेकॉर्डब्रेक यश
Maharashtra Assembly Election Result : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी 65 टक्के मतदान झालं. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता.

Maharashtra Assembly Election Result : राज्यात पेक्षा जास्त जागा... विधानसभा निवडणुकीत रेकॉर्डब्रेक यश... आणि पुन्हा सत्तेची सूत्रं. महायुतीच्या या यशामागचं एक सर्वात मोठं सीक्रेट आहे ते म्हणजे एक योजना. होय, ज्या योजनेचा मोठा गाजावाजा झाला आणि प्रचारसभेतला प्रमुख मुद्दा बनला तीच लाडकी बहीण योजना. हीच लाडकी बहीण योजना कशी गेमचेंजर ठरली? पाहूयात या खास रिपोर्टमधून,
लाडकी बहीण ही निवडणुकीच्या प्रचारात महायुतीचा सर्वात स्ट्राँग पॉईंट ठरलेली योजना. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अवघ्या 5 महिन्यांपूर्वी महायुती सरकारनं ही योजना आणली. ती लाभार्थी महिलांपर्यंत पोहोचवली. आज निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीच्या कॉलमसमोर दिसणारे हे आकडे याच योजनेचं फलित आहे असं खुद्द मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सांगतायत.
जुलै ते नोव्हेंबरपर्यंत सरकारनं महिन्याला 1500 रुपये लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा केले. राज्यातल्या जवळपास एक कोटी 80 लाख महिलांना आतापर्यंत या योजनेचा लाभ मिळालाय. त्यात निवडणूक प्रचारात मुख्यमंत्री शिंदेंनी नवं सरकार येताच लाडकी बहीण योजनेचे पैसे 1500 वरुन 2100 करणार असं जाहीर केलं होतं.
प्रचारातल्या याच घोषणेचा रिझल्ट मतदानाच्या टक्केवारीतही पाहायला मिळाला. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत विक्रमी 65 टक्के मतदान झालं. त्यात महिलांचा सहभाग लक्षणीय होता. लाडक्या बहिणींनी भरभरुन मतदान केलं आणि महायुतीला पुन्हा सत्तेत आणलं.
लाडकी बहीणसह शेतकरी आणि मुलांच्या शिक्षणासंदर्भात महायुती सरकारनं घेतलेल्या निर्णयांचाही या निवडणुकीत फायदा झाल्याचं पाहायला मिळालं.
लोकसभेवेळच्या टाळलेल्या चुका, नियोजनबद्ध केलेला प्रचार सोबतच आरएसएसचं मायक्रो प्लॅनिंग राबवलेल्या योजना, त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेले प्रयत्न यासारखी अनेक कारणं आजच्या महायुतीच्या विजयात दिसून येतायत. आता पुढची पाच वर्ष हे सरकार जनमताचा कौल मानून कसं काम करतं हे पाहणं महत्वाचं ठरेल.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
