Maharashtra Election 2019 Voting | राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड, मतदार ताटकळत
ईव्हीएममधील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला. ईव्हीएममधील बिघाड दुरुस्त करण्यात आला किंवा मशीन बदलण्यात आल्या, मात्र काही मतदारांना मतदानासाठी वाट पाहावी लागली.
मुंबई : राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. दुपारी 2 वाजेपर्यंत सरासरी 31 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. निवडणूक आयोग, सामाजिक संस्था आणि काही व्यापारी, दुकानदार यांनी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी विविध उपक्रम राबवले. मात्र मतदानाची आकडेवारी पाहिल्यास त्याचा फार परिणाम झालेला दिसत नाही. एकीकडे ही परिस्थिती असताना मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांना काही ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे ताटकळत उभं राहावं लागलं आहे.
राज्यातीन अनेक भागातून ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. वरळी मतदारसंघात दूरदर्शनजवळच्या मतदान केंद्रावर मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांना काही वेळ रांगेत वाट पाहत उभं राहावं लागलं.
औरंगाबादच्या पैठण तालुक्यातील वाहेगांव येथे बुथ क्रमाक 4 मधील ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला होता. ही मशिन बदलण्यासाठी मतदारांना जवळवास एक ते दीड तास वाट पाहावी लागली. वैजापूर तालुक्यातील बोरसर येथील मतदान केंद्र क्रमांक 93 मध्येही मशिन बंद पडल्याची घटना समोर आली होती.
वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात मोहगाव येथे मतदान केंद्रावर एक तासाहून अधिक काळ ईव्हीएम मशिन बंद होती. त्यामुळे मतदारांची मतदान केंद्राबाहेर रांगेत उभं राहावं लागलं. हिंगोलीतील सेनगाव तालुक्यातील सापडगाव येथे ईव्हीएम मशीनमधील तांत्रिक बिघाड दुरुस्त केल्यानंतर दोन तासाने मतदान प्रकियेला सुरुवात झाली.
लातूरमधील जळकोट तालुक्याच्या मरसंगवी गावातील बूथ क्रमांक 104 वरील मशीन काम करत नसल्याने मतदान काही वेळ बंद होतं. परभणीतील जिंतूर विधानसभा मतदार संघातील दूधनगाव येथील 367 मतदान केंद्रावर जवळपास अर्धा तास ईव्हीएम पडल्याने मतदान थांबलं होतं.
अशारीतीने अनेक ठिकाणी ईव्हीएममधील बिघाडामुळे मतदान प्रक्रियेत व्यत्यय आला. ईव्हीएममधील बिघाड दुरुस्त करण्यात आला किंवा मशीन बदलण्यात आल्या, मात्र काही मतदारांना मतदानासाठी वाट पाहावी लागली.