Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे सरकारचा उद्या होणारा राज्य मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर, सूत्रांची माहिती
Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा उद्या होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई : राज्यातला रखडलेला मंत्रिमंडळ विस्ताराला (Maharashtra Cabinet Expansion) काही मुहूर्त मिळत नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. कारण उद्या होणारा मंत्रीमंडळ विस्तार पुढे ढकलल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. येत्या सोमवारी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर राज्य मंत्री मंडळ विस्ताराबाबत निर्णय अपेक्षित आहे.
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आज आपापले दिवसभरातले प्रशासकीय कार्यक्रम रद्द केले. उपमुख्यमंत्र्यांनी आजचे कार्यक्रम तातडीनं रद्द करत दिल्लीला गेले त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार उद्याच होणार असल्याची माहिती समोर आली होती. भाजपचे 8 तर शिंदे गटामधील सात जण मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात, अशी देखील माहिती समोर आली होती. मात्र आता सर्वोच्च न्यायलयातील सुनावणीनंतर विस्ताराबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडून नव्या सरकारवर ताशेरे ओढले जात आहेत. सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्या आठवड्यातच मंत्रिमंडळ विस्तार होणे अपेक्षित होतं परंतु चार आठवडे झाले तरी विस्तार होत नाही त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात नेमकी अडचण काय? असा प्रश्न उपस्थित झालाय. बुधवारी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावतीनेही मंत्रिमंडळ विस्ताराबाबत संकेत देण्यात आले आहेत. रविवारच्या आधी मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे केसरकर यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. त्यामुळे आता शिंदे- फडणवीसांच्या मंत्रिमंडळाची गाडी नेमकी कुठे अडकली याची कोणालाही स्पष्टता नाही.
मंत्रिमंडळाचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार?
मंत्रीमंडळाचा अंतिम निर्णय अमित शाह घेणार आहेत, परंतु अमित शाह यांच्यासोबत शिंदे यांची चर्चाच झालेली नाही. भाजपकडे स्वतःचे आणि अपक्ष असे 115 आमदार आहेत. शिंदे यांच्याकडे शिवसेना आणि अपक्ष असे 50 आमदार आहेत. शिंदेंसोबत आलेल्या मोठ्या नेत्यांना मंत्री करावेच लागेल. त्याच प्रमाणे मंत्रिमंडळ विस्तार करताना एकनाथ शिंदेंना प्रादेशिक समतोल बघावा लागेल, असे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. आज फडणवीस दिल्लीला शाह यांच्या भेटीला गेल्याच्या चर्चा होत्या.