Maharashtra Day 2021 : कोरोना संकटादरम्यान राज्यभरात 'महाराष्ट्र दिन' साजरा; राज्यपाल, मुख्यमंत्र्यांसह अनेकांच्या शुभेच्छा
राज्यात सध्या कोरोना महामारी सुरु आहे, अशा परिस्थितीत महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला. आजपर्यंत महाराष्ट्राने अनेक संकटं झेलली असून यावरही आपण मात करु अशाच शुभेच्छा अनेकांनी दिल्या आहेत.
मुंबई : राज्यात कोरोना संसर्गामुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आरोग्य व्यवस्था कोलमडली असून अनेक कोरोना रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आज 'महाराष्ट्र दिन' साजरा करण्यात आला आहे. राज्यपाल, भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी महाराष्ट्र दिन साजरा करत या संकटात लढण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नवीन, बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी एकत्र या : राज्यपाल
गेल्या सुमारे सव्वा वर्षाहून अधिक काळ आपण कोविड संसर्गाविरोधात एकजूटीने लढत आहोत. महाराष्ट्र शासनाने या साथीला आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाय योजले आहेत. कोविड-19 च्या संकटावर मात करीत असताना राज्याची अर्थव्यवस्था सांभाळत वंचित-उपेक्षित, शेतकरी, महिलांना न्याय देतानाच राज्याच्या प्रगतीचा आलेख उंचावला जाईल यासाठी महाराष्ट्र शासन कार्य करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने जाहीर केलेल्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करुन कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन राज्यपाल कोश्यारी यांनी जनतेशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. एक नवीन व बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे सर्व नागरिकांना आवाहन करत त्यांनी महाराष्ट्र दिनाच्या या मंगलप्रसंगी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. आजच्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त राज्यपालांनी सर्व श्रमिक बंधू भगिनींनाही शुभेच्छा व्यक्त केल्या.
मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 61 व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत प्राणाची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांना महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिवादन केले. आज सकाळी हुतात्मा चौक येथील स्मारकास मुख्यमंत्र्यांनी भेट देऊन स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, मुख्य सचिव सीताराम कुंटे, प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, पोलीस महासंचालक संजय पांडे, महानगरपालिका आयुक्त इक्बाल चहल, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी देखील हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
उपमुख्यमंत्र्यांचे पुण्यात ध्वजारोहण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज महाराष्ट्र दिनानिमित्त पुणे येथील विधानभवन आवारात ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात हुतात्मा झालेल्या महाराष्ट्राच्या वीर सुपुत्रत्रांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना अभिवादन केले. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.