Beed News : डॉक्टर दाम्पत्याचा बेजबाबदारपणा; माता आणि नवजात बाळाचा मृत्यू, दोघांवर गुन्हा दाखल
Beed News : ..तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती.
Beed News : प्रसुतीदरम्यान डॉक्टरांनी हलगर्जीपणा केल्याने महिलेचा आणि तिच्या नवजात बाळाचा (New Born Baby And Mother Death) मृत्यू झाल्याची घटना माजलगावच्या जाजू रुग्णालयात (Jaju Hospital) घडली आणि याच प्रकरणी जबाबदार असलेल्या डॉक्टर जाजू यांना पोलिसांनी अटक केली आहे
...तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही
बीडच्या माजलगाव येथील जाजु हॉस्पिटलमध्ये सोनाली गायकवाड या महिलेला प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रसूतीदरम्यान तिची तब्येत अचानक खालावली आणि त्यातच तिचा आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला होता. महिला आणि बाळाच्या मृत्यूला जाजु हॉस्पिटलचे डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप करत जोपर्यंत डॉक्टरांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका महिलेच्या नातेवाईकांनी घेतली होती.
कोणते उपचार करायचे याची डॉक्टरना माहिती नव्हती
त्यानंतर या सर्व प्रकरणात पोलिसांनी लक्ष घालून महिलेचा मृतदेह हा अंबाजोगाईच्या स्वराती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला असून महिलेचा मृत्यू नेमका कशाने झाला? हे तपासण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या सदस्यांनी माजलगाव येथील जाजु रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची विचारणा केली आणि त्यांनी केलेल्या तपासात जाजू रुग्णालयातील डॉक्टर विजयकुमार जाजू आणि उर्मिला जाजू याना प्रसूतीदरम्यान कोणते उपचार करायचे याची माहिती नसल्यानं महिलेचा मृत्यू झाल्याचा अहवाल समितीने पोलिसांसमोर सादर केला आहे.
डॉक्टर दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल
चौकशी समितीच्या अहवालानंतर मृत महिला सोनाली गायकवडच्या वडिलांच्या फिर्यादीवरून माजलगाव पोलिस ठाण्यात जाजु दाम्पत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून माजलगाव पोलिसांनी डॉक्टर विजय कुमार जाजु आणि डॉक्टर उर्मिला जाजु दोघांनाही अटक केली आहे.. उपचार पद्धती माहित नसतानाही चुकीचे उपचार करून रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या डॉक्टर जाजू दांपत्याचा वैद्यकीय परवाना रद्द करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे
इतर महत्वाच्या बातम्या: